*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या कोरोना प्रतिबंधासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा*
पुणे दि. 21: कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेऊन राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
कोरोना प्रतिबंधासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपायोजना व आगामी कालावधीत करावयाच्या उपायोजनाबाबत महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आज विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड , अपर आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल , उपायुक्त श्री राजेंद्र मुठे , श्री अनिल मुळे , उपजिल्हाधिकारी श्री सुनील गाढे ,आरती भोसले ,अस्मिता मोरे ,सचिन इथापे आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिेकच्या वतीने सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील तसेच प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी मिळून या संकटावर मात करू, असा विश्वास व्यक्त केला.
आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, परदेशी प्रवासाचा इतिहास असलेल्या काही नागरिकांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती बाहेर आढळून आल्यास प्रशासन अथवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने व्यापक स्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरी व ग्रामीण भागात विविध बाबींना बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना ही बंदी लागू करण्यात आली आहे. विविध आस्थापनांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
डॉ म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचे हे संकट वाढू नये, ही सर्वांची जबाबदारी आहे. संकट टाळण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. कोरोना विषाणूचे संकट पुढच्या टप्प्यात जाणार नाही, यासाठीची आवश्यक ती सर्व दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येकाने स्वत:ची, कुटुंबाची तसेच समाजाची काळजी घ्यावी. तसेच घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यायला पाहीजे. दैनदिन मजूरीवर ज्यांची उपजिविका अवलंबून आहे, त्या कुटुंबाला तीन महिने धान्य पुरविले जाणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यात येईल, त्यात खंड पडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
0000
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com
मेलवर पाठविणे बंधनकारक*