राज्यमंत्री बच्चू कडू; स्पर्धा परिक्षेकडून व्यवसायाकडे वळलेल्या पंडित शिंदे यांच्या 'कोंढाणा'चे उद्घाटन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


#PRESSNOTE


*स्पर्धा परीक्षेच्या तरुणांनी द्यावे उद्योजकतेला प्राधान्य*


राज्यमंत्री बच्चू कडू; स्पर्धा परिक्षेकडून व्यवसायाकडे वळलेल्या पंडित शिंदे यांच्या 'कोंढाणा'चे उद्घाटन


पुणे : "सरकारी नोकरी मिळविण्यासाठी चारपाच वर्षे घालवूनही त्यात यश येत नसेल, तर तरुणांनी वेळीच त्यातून बाहेर पडून उद्योजकतेला प्राधान्य दिले पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपला बी-प्लॅन नेहमी तयार ठेवत स्वयंरोजगारातून आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंडित शिंदेसारख्या युवकाने असे धाडसी पाऊल उचलून 'कोंढाणा' हॉटेल सुरु केले आहे. तो या क्षेत्रात 'तानाजी' व्हावा आणि इतरांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी," असे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. यापुढे स्पर्धा परीक्षा पोर्टलद्वारे न घेता आयोगामार्फत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पंडित शिंदे या युवकाने सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीजवळ सुरु केलेल्या हॉटेल कोंढाणाचे उद्घाटन बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. प्रसंगी रतन सूर्यवंशी, युवराज शेवाळे, महेश बडे, किरण निंभोरे, वैभव भोसले आदी उपस्थित होते. लातूरच्या शिरूरअनंतपाळ तालुक्यातील कळमगाव येथून पुण्यात येऊन पाच वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेल्या पंडित शिंदे यांनी आता व्यवसायात पाऊल टाकत हॉटेल सुरु केले आहे.


बच्चू कडू म्हणाले, "स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र तुलनेने उपलब्ध जागा खूप कमी आहेत. त्यामुळे प्रचंड मेहनत करूनही मोजक्याच तरुणांना नोकरी मिळते. अनेक तरुण आपल्या आयुष्याची पाच-दहा वर्षे या अभ्यासात घालवतात. यश मिळाले नाही, तर हताश होतात. त्यामुळे वेळीच निर्णय घेत स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून दिला पाहिजे आणि व्यवसाय सुरु करण्यावर भर दिला पाहिजे. सरकारकडून अशा तरुणांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाईल."


पंडित शिंदे म्हणाले, "खूप अभ्यास केला. मात्र, या स्पर्धेत कुठेतरी कमी पडलो. पण या पाच वर्षातील अनुभवाचा उपयोग करून व्यवसायात स्थिरावण्याचा प्रयत्न आहे. आयुष्याचा लढा यशस्वी करणाची प्रेरणा देणाऱ्या कोंढाणावरून हे नाव घेतले आहे. माझी पुतणी आर्या युवराज शेवाळे हिने ते नाव सुचवले आहे. प्रेरणा घेत हॉटेल सुरु केले आहे. चांगले, दर्जेदार, आरोग्यदायी व चविष्ट पदार्थ लोकांना खाऊ घालण्याचा प्रयत्न आहे."


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*