*घोड, कुकडी व सीना, विसापुर  प्रकल्पाच्या कालव्यांवरील लाभधारक शेतकऱ्यांना अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांचे आवाहन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*घोड, कुकडी व सीना, विसापुर  प्रकल्पाच्या कालव्यांवरील लाभधारक शेतकऱ्यांना अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांचे आवाहन*


    पुणे, दि.25: करोनाच्या पार्श्वभुमीवर घोड, कुकडी व सीना, विसापुर  या प्रकल्पाच्या कालव्यांवरील लाभधारक शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी केले आहे.


 घोड, कुकडी व सीना, विसापुर या कालव्यांचे ऊन्हाळी आवर्तने चालु आहेत. शेतकऱ्यांसाठी, शासनाने आजच्या बाजारभावाप्रमाणे  २० ते २५ हजार कोटी रूपये निधी खर्च करून हे प्रकल्प  बांधले आहेत.     मागील आवर्तन काळात व आवर्तनापूर्वी बैठका घेऊन यामध्ये हे प्रकल्प जपण्याचे व आवर्तन सुरळीत होण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यास सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.


 मागील आवर्तनामधे अपुरा कर्मचारी वर्ग, कालव्यांची अपुरी वहन क्षमता व अन्य मर्यादा असताना देखील पाण्याची बचत करून सर्वांना वेळेत व पुरेसे पाणी दिले आहे.  


यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. लाभधारक शेतकऱ्यांच्या सहभागावर कुकडीचे असे आवर्तन करून एक आदर्श घालुन  दिलेला आहे. याबाबत लाभधारक शेतकरी व कुकडीचे कर्मचारी वर्ग यांचा सार्थ अभिमानही आहे. 


सर्व जग करोनाच्या विळख्यात सापडलेले आहे. सगळीकडे जमावबंदी आहे, अशा स्थितीत
कुकडीचे अधिकारी/ कर्मचारी कुटुंबापासुन / गावापासून सर्वांसाठी अहोरात्र ही अत्यावश्यक सेवा देत आहेत. 


त्यांना नियोजना मध्ये नियंत्रणामध्ये काही बाधा येईल असे अनधिकृत कृत्य कोणाकडून होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोठेही अनुचित  प्रकार होताना आढळल्यास त्वरित जवळच्या शाखा कार्यालयास अथवा पोलीस स्टेशन ला कळवावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी केले आहे.


 करोना विषाणु संकटाच्या  पार्श्वभुमीवर हे आवर्तन सुरळीत पार पाडुया, असेही श्री. धुमाळ यांनी म्हटले आहे.


00000