पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सन्मान, समानता केवळ महिला दिनापुरती मर्यादित असू नये
रुपाली चाकणकर; जागतिक महिला दिनानिमित्त पद्मा प्रतिष्ठान, विजयश्री इव्हेंट्सतर्फे महिलांचा सन्मान
पुणे : “सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात आजच्या काळात स्त्रीचा संघर्ष गर्भापासून सुरु होतो, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. समाजप्रबोधनाची गरज आजही कायम आहे. हिंगणघाट, कोपर्डी आणि निर्भयासारख्या घटना घडतात. घटना घडल्यावर आपण चार दिवस निषेध करतो आणि नंतर विसरून जातो. त्यापेक्षा या घटना घडूच नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ एक दिवसाच्या सणासारखा महिला दिन साजरा करण्यापेक्षा नेहमीच महिलांना समानता आणि सन्मान दिला, तर त्याही समाजातील कुप्रवृत्तींविरुद्ध लढा देत राष्ट्राचा उद्धार करतील,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
पद्मा प्रतिष्ठान आणि विजयश्री इव्हेंट्स यांच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार आणि गरजू अपंग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात आयोजित कार्यक्रमात महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका करणाऱ्या प्राजक्ता गायकवाड, सैराटफेम सुरेश विश्वकर्मा, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे सचिन इटकर, शिवसेनेचे शहर उपप्रमुख किरण साळी, एमआयटीचे संचालक महेश थोरवे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनोद शहा उपस्थित होते. निवेदिका मोनिका जोशी यांच्या खुमासदार शैलीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी सुमनताई मोरे (सामाजिक कार्य), सुजाता परांजपे (शिक्षण क्षेत्र), प्रतिभा जोगदंड (क्रीडा क्षेत्र), सारिका निंबाळकर (महिला सबलीकरण), उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे (राजकारण), अश्विनी येमुल (उद्योगक्षेत्र), प्रज्ञा पापळ (झुंबा प्रशिक्षण), रेणुका घोसपुरकर (फॅशन डिझाईन) यांचा सत्कार करण्यात आला. प्राजक्ता गायकवाड यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा आठवली की आजही अभिमान वाटतो. पालकांनी पुस्तकी ज्ञानाचा एखादा धडा आपल्या मुलांना नाही शिकवला, तरी चालेल; परंतु छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचे विचार त्यांना नक्की शिकवावेत. कायद्याच्या चौकटीत राहून महिला अत्याचारातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू.”
बच्चू कडू म्हणाले, “स्त्रियांच्या योगदानाशिवाय राज्याची आणि राष्ट्राची प्रगती होत नाही. त्यासाठी स्त्रियांना समानतेची वागणूक आणि शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महिला सक्षमीकरणाशिवाय बलशाली समाज घडू शकत नाही.”
प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, “महिलांना सन्मानाने जगण्याची संधी साडेतीनशे वर्षांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी दिली. त्यांच्याच या भूमीत हिंगणघाटसारख्या घटना घडणं हे दुर्दैवी आहे. हे चित्र बदलण्यासाठी शिवविचार आणि शंभूविचार जपण्याची गरज आहे.”
सुरेश विश्वकर्मा, सचिन इटकर यांनीही मनोगत व्यक्त करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शशिकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. निखिल निगडे यांनी आभार मानले. बालकलाकार प्रिन्स आणि तन्वी यांनी उपस्थितांचे मने जिंकली.