पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात !*
.................................................
( डॉ. अब्दुल कादर मुकादम यांच्या पुस्तकावर"लोकसत्ता लोकरंग' पुरवणीत डॉ. शमसुद्दीन तांबोळी लिखित समीक्षा लेखातून )
.......................................
ज्येष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी आणि मानवतावादी अभ्यासक एम. एन. रॉय आपल्या 'हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम'मध्ये असे म्हणतात की,
"इस्लामच्या बाबतीत सर्वात अनभिज्ञता असणारा समाज म्हणजे मुस्लीम समाज आहे."
हा अभिप्राय लक्षात घेतला तर इस्लामच्या बाबतीत अन्य धर्मीय समुदायातील अनभिज्ञता किती असेल हे आपण समजून घेऊ शकतो.
इस्लाममधील महिलांचे स्थान आजही बहुचर्चित विषय आहे. तलाक पद्धती, बहुपत्नीत्व, बुरखा पद्धती यासंदर्भात केलेले विवेचन तसेच यानिमित्ताने होणारे आरोप आणि प्रत्यारोप, इ. वाचकांना इस्लाम कडे पाहण्याचा नवा विचार देऊ शकतील.
इस्लामला कुटुंबनियोजन मान्य नाही अशी धर्मवादी भूमिका पुरोहित वर्गाने घेतल्यामुळे त्याचा परिणाम मुस्लीम समाजावर झाला. हिंदू आणि इतर धर्मीयांकडूनही इस्लामला कुटुंबनियोजन मान्य नसल्याचा प्रचार करण्यात आला. मुस्लीम समाजात कुटुंबनियोजन केले जात नाही असा आजही आरोप करण्यात येतो.
भारतातील सुन्नी संप्रदायात देवबंदी, बरेलवी तबलिकी अशा प्रभावी विचारधारा आहेत.यातूनच इस्लाम मधील बहुसांस्कृतिकता जन्माला आली. इस्लामच्या शिकवणुकीबद्दल संभ्रम निर्माण झाले. विविध परंपरा, चालीरीती म्हणजेच इस्लाम, राजकीय आणि धार्मिक अश्रफी वर्गाचे धार्मिक वर्तन म्हणजे इस्लाम असा साधा-सोपा अर्थ काढण्यात आला. तोच अर्थ प्रसारित झाला. हाच इस्लाम आहे असा अन्य धर्मीयांचा समज झाला. ही पार्श्वभूमी अनेक अनर्थास कारणीभूत ठरली. ज्यामुळे इस्लामची उदारमतवादी परंपरा अस्पष्ट राहून पारंपरिक प्रतिमा गडद झाली.
इस्लाम संबंध असणारे अनेक समज-गैरसमज, मतप्रवाह, वादग्रस्त संकल्पना यांबद्दलचा अभ्यासपूर्ण खुलासा अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांनी ' इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात ' या ग्रंथात केला आहे.
मुस्लीम धर्म सुधारकांनी इस्लामचा उदारमतवाद मांडण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला आहे. सर सय्यद अहमद खान, मोहम्मद इकबाल, मौलाना आझाद ते असगर अली इंजिनिअर पर्यंत... हीच परंपरा अब्दुल कादर मुकादम यांनी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, 'सर्वच धर्म मोठे असतात हे एक सत्य आहे. सर्वच धर्माच्या मर्यादा असतात हे दुसरे सत्य आहे. हिंदू समाजाने मुस्लीम धर्मातील मोठेपणा समजून घ्यावा आणि स्वतःच्या धर्मातील मर्यादा, तसेच मुस्लीम समाजात हिंदू धर्मातील मोठेपणा समजून घ्यावा आणि स्वधर्मातील मर्यादा.' आपापल्या धर्मातील कालविसंगत मर्यादा समजून घेतल्यास समाज सुधारणेची प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. धर्मातील चिरंतन आणि तत्कालिक तत्वे कोणती हेसुद्धा या पुस्तिकेत आले असते, तर ते
अधिक भरीव योगदान ठरले असते असे वाटते.
................................................
*दीपक बीडकर यांची रविवारीय वाचनसभा*.
_वाचन संस्कृतीला समर्पित उपक्रम_