तरुणाईची नेमकी नस ओळखून ज्वलंत विषयावर भाष्य करणारा अजिंक्य सिनेमा येत्या २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक ''अजिंक्य''च्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. ल्युमिनरी सिने वर्ल्ड निर्मित आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. यांची प्रस्तुती असलेला ''अजिंक्य'' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्माते अरुणकांत शुक्ला, राघवेंद्र के. बाजपेयी, नीरज आनंद, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा यांची निर्मिती असलेल्या अजिंक्य या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं असून कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत. दिग्दर्शक अ. कदिर यांचा हा पहिलाच प्रयत्न असून सांगली जिल्ह्यातील जत, कोल्हापूर आणि मुंबई या शहराचा त्यांनी सिनेमाच्या चित्रीकरणात उत्तम वापर करून घेतला आहे. अजिंक्य सिनेमाबद्दल दिग्दर्शक कदिर म्हणतात, या सिनेमाची कथा आणि त्याचा नायक आपल्यातील एक आहे. वादळी वेगाने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येकाला या सिनेमाचा नायक आपणंच असल्याचे सिनेमा पाहताना नक्की जाणवेल. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची जोडी या सिनेमातून पहिल्यांदा झळकणार आहे. अजिंक्य सिनेमातील कथा आणि भूमिके विषयी भूषण म्हणाला, सिनेमातील प्रमुख भूमिका म्हणजेच अजिंक्यची भूमिका सद्य परिस्थितीचं प्रतिनिधित्व करणारी आहे. भावनांचं काँक्रीटीकरण झालेल्या समाजात आपल्याला माणुसकीचे किमान भान देणारा हा सिनेमा आहे. यात अजिंक्यचा मित्रपरिवार आणि त्याच्या आयुष्यातील मह्त्वाची व्यक्ती रितिका म्हणजेच प्रार्थना बेहेरे यांची त्याला मोलाची साथ मिळते. एक स्वयंसेवी संस्थेत काम करणारी रितिका म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या भूमिकेविषयी सांगते, रितिका आणि अजिंक्य या व्यक्तिरेखा नसून हे दोन विचार आहेत जे आधुनिकता आणि माणुसकीचा उत्तम मेळ घालतात. साधी सरळ अशी रितिका समाजात माणुसकीच्या भावनांचा ओलावा टिकवून ठेवते. या सिनेमात उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, वंदना वाकनीस, पल्लवी पाटील, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंद, त्रियुग मंत्री यांच्या प्रमुख भूमिका आहे. सिनेमांचे संगीत दिग्दर्शन रोहन - रोहन या प्रसिद्ध संगीतकार जोडने केलं आहे. या सिनेमातील गाण्यांबद्दल रोहन गोखले म्हणाले, आजकाल सिनेमाच्या टिझर वा ट्रेलर पेक्षा सिनेमाची गाणी देखील मोठ्या प्रमाणावर पाहिली जातात. जी सिनेमाचा फस्टलूकही ठरु लागली आहेत. त्यामुळे सिनेमा तयार करणाऱ्या निर्माता दिग्दर्शकाप्रमाणे आमच्यावरही संगीतकार म्हणून मोठी जबाबदारी असते. गाण्यांचे शब्द, त्याचं संगीत याच्याकडे प्रेक्षकांचं बारीक लक्ष असतं. असं संगीत ज्यावेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं तेव्हा त्यांच्याकडून येणारा प्रतिसाद संगीतकारासाठी लक्षवेधी ठरतो. ''अजिंक्य'' सिनेमातील चारही गाणी आम्हाला असाच लक्षवेधी प्रतिसाद देतील असा विश्वास आहे. गीतकार किरण कोठावडे यांनी लिहिलेले ''अलगद अलगद'' हे रोमँटिक सॉंग गायक रोहन प्रधान आणि मीनल जैन यांनी गायलं आहे. गायक रोहन गोखले यांच्या दमदार आवाजातील ''स्वप्नांना...'' हे मोटिव्हेशनल गाणं जय अत्रे याने लिहिलं आहे. ताल धरायला लावणारं गायिका प्राजक्ता शुक्रे हिच्या ठसकेबाज आवाजातील "माझे फेव्हरेट राव" हे आयटम सॉंग गीतकार जय अत्रे याच्या लेखणीतून उतरलं आहे. मनाला भिडेल असं ''आता तरी बोल ना'' हे भावनिक गाणं मनोज यादव यांनी लिहिलेलं असून गायक सुरज जगन आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. या सिनेमाचे छायांकन माधवराज दातार आणि दीपक पवार, संकलन रोहित म्हात्रे आणि विनायक कोंडे, पार्श्वसंगीत सलील अमृते, सहदिग्दर्शक उमेश नार्वेकर केले आहे. झक्कास गाणी आणि दमदार कथेचा उत्तम मेळ असणारा अजिंक्य हा सिनेमा २० मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
व्यवस्थे विरुद्ध लढा देत लक्ष साध्य करणारा ''अजिंक्य''
पुणे प्रवाह न्युज पोर्टल
व्यवस्थे विरुद्ध लढा देत लक्ष साध्य करणारा ''अजिंक्य''