एकट्या नागपुरात 59 कोरोनाबाधित असल्याची 'ती' ऑडिओ क्लिप साफ खोटी; फॉरवर्ड करू नका!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


एकट्या नागपुरात 59 कोरोनाबाधित असल्याची 'ती' ऑडिओ क्लिप साफ खोटी; फॉरवर्ड करू नका!
___________________________________


 कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या वेगापेक्षा या आजाराबद्दल अफवा पसरण्याचा वेग अधिक आहे, असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. अमूक गोष्टीमुळे 'कोविड 19' चा धोका वाढतो, अमूक गोष्ट खाल्ल्याने किंवा जवळ ठेवल्याने हा विषाणू लांब राहतो, यावरून बरीच चुकीची माहिती आत्तापर्यंत व्हायरल केली जात होती. त्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याचं समोर येतंय. नागपूरमध्ये 59 वा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची एक ऑडिओ क्लिप व्हॉट्सअपवर व्हायरल झालीय. परंतु, ती  पूर्णपणे बोगस आहे आणि ही या क्लिपमध्ये बोलणाऱ्या दोघांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.


नागपूरमध्ये ५९ पॉझिटीव्ह रुग्ण २०० पेक्षा जास्त संशयित आहेत, तर डॉक्टरही व्हेंटीलेटरवर आहेत, अशा आशयाचा हिंदीतील संवाद असलेली ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, ही ऑडिओ क्लीप साफ खोटी असून कुणीही फॉरवर्ड करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, ती ऑडिओ क्लीप साफ खोटी असून त्या क्लीपमधील संवाद करणाऱ्या दोन्ही व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी म्हटले आहे. 


कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा त्याच्या अफवाच जास्त पसरत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावरुन काही क्षणातच या अफवा शहरभर होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन शहरात भितीचे वातावरण तयार होते. या संपूर्ण परिस्थितीचा ताण प्रशासनावर येतो. मात्र, नागरिक खात्री न करता, किंवा संबंधित बाबीची प्रशासनाकडे माहिती न देता, अशा क्लिप व्हायरल करतात. त्यामुळे या अफवा कोरोनापेक्षा जास्त वेगाने पसरतात. मात्र, ती अफवा असल्याची बातमी तितक्या वेगाने पसरत नाही, हे दुर्दैव. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथेही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. पुणे आणि बार्शीतील दोन मित्रांचा तो संवाद सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्यामध्ये एक संशयित रुग्ण पुण्यातून बार्शीला आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, तपासाअंती ती ऑडिओ क्लिप फेक असून संवाद करणारी व्यक्ती दारुडी असल्याचे उघड झाले. त्यानंतर, बार्शीतही याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. 


आता, नागपूरमध्येही अशीच ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. मात्र, चौकशीअंती ती क्लिपही साफ खोटी असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनीही यासंदर्भात सायबर विभागाकडून कारवाईचं काम सुरु असल्याचं म्हटलंय.