*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*✌सकारात्मक अस काही✌*
*बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण उपलब्ध करून देणारे मंदार आणि स्मिता बहिरट ; कृतिशील दाम्पत्य*
आज पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुले मोठ्या संख्येने आहेत. पुढील महिन्यात MPSC ची परीक्षा आहे. कोरोनाच्या भीतीने घरी गेलो तर अभ्यास होणार नाही म्हणून अनेक विद्यार्थी पुण्यातच थांबले. मेस, हॉटेल बंद झाली आणि जेवणाची व्यवस्था होत नाहीये. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आणि या विद्यार्थ्यांना मोफत जेवणाचा डबा देण्याची तयारी दाखवली. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या कृतिशील कार्यात सहभागी असणारे आमचे मित्र मंदार बहिरट आणि त्यांच्या पत्नी स्मिता बहिरट यांनी शिवाजीनगर गावठाणात या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे उपलब्ध करून दिले..घरात आजारी सासूची (स्मिता वाहिणींच्या आई सध्या आजारी आहेत) काळजी करत अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना जेवण देणाऱ्या स्मिता बहिरट ताईंसारख्या बहिणी जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराजांचे कृतीशील विचार पुन्हा पुन्हा सत्यात उतरत राहतील...
कोरोनाच्या साथीने जगभर हाहाकार माजवला आहे. प्रत्येक जण आपापल्या सुरक्षेसाठीची काळजी घेतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर थोडं इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालावी म्हणून विचार करत असतांना आठवलं ते *जगभरातील प्लेगची साथ... इ.स.1897 मध्ये संपूर्ण जगभर प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. भारतातही प्लेग वाऱ्याच्या वेगासारखा पसरला. पुण्यातही प्लेगचा प्रसार झाला. लोकांच्या मदतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांच्या सुश्रुषेसाठी रुग्णालय उघडलं होतं.* मुलगा डॉ.यशवंत रुग्णांची सेवा करत होता. प्लेगच्या साथीने आजारी असलेल्या एका लहान मुलीला आपल्या पाठीवर घालून सावित्रीबाई रुग्णालयात घेऊन आल्या आणि प्लेगच्या संसर्गाने त्यांना गाठलं आणि त्यातच त्यांचा 10 मार्च 1897 रोजी मृत्यू झाला..
त्याचवेळच्या कोल्हापूर संस्थानात प्लेग भीती निर्माण करता आली नाही. कारण त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर होते छत्रपती राजर्षी शाहू महाराज. त्यावेळी राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी कशी घ्यावी याचा आदर्शच शाहू महाराजांनी समोर ठेवला.
मुंबई, पुण्यात प्लेगची साथ पसरत असल्याची वृत्त येत असताना *शाहू महाराजांनी संपूर्ण कोल्हापूर रिकामं केलं. त्यावेळी समाजावर अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा होता. पण शाहू महाराजांनी रयतेला वैज्ञानिक माहिती देण्याच काम हाती घेतलं. लोकांना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी हजारो पत्रक छापली. ती वाटली. ज्यांना वाचता येत नाही, त्यांच्यासाठी गावागावात त्यांचं वाचन करण्यात आलं. त्यानंतर त्यांची कारणं पटवून देण्यात आली. गावांचं पुर्नवसन करून गाव स्वच्छ केलं. दवाखाने उभारले. इथपर्यंतच महाराज थांबले नाहीत. त्यांनी प्लेगवर औषध शोधण्यास सुरूवात केली. होमिओपॅथीमध्ये यावर असं औषध असल्याचं त्यांना कळालं. *त्यानंतर देशातील पहिले सार्वजनिक होमिओपॅथी रुग्णालय कोल्हापुरात सुरू झालं.* महाराजांनी प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी केवळ प्रजेला कामाला लावलं नाही. तर ते स्वतः यात लक्ष घालत होते. *लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी लस टोचून घेतली होती.* त्यांनी केलेल्या तत्पर आणि तातडीच्या उपाययोजनांमुळे कोल्हापूर संस्थानात प्लेगच्या साथीला मनुष्यहानी करता आली नाही..
त्यावेळच्या कोल्हापूर संस्थानात या प्लेगला शिरता आलं नाही. त्यामागे होते छत्रपती राजर्षी शाहू महाराज.
आज कोरोनाच्या निमित्ताने विचार करून बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल, "ही माणसं नव्हतेच तर हे खरे खुरे मानवी रुपात खरे खुरे देव होते."
हे सर्व आठवण्याच कारण म्हणजे, अडचणीच्या काळात स्वतःचा विचार न करता समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा आम्हाला या महापुरुषांनी घालून दिली...
©कैलास वडघुले,
-राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन
◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*