कोरोनाविरुध्‍दच्‍या लढाईत डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे -          विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाविरुध्‍दच्‍या लढाईत डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे


-          विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर


            पुणे, दिनांक 28- कोरोना हा विषाणू समाजाचा शत्रू असून त्‍याच्‍याविरुध्‍दच्‍या लढाईत शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे,  असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्‍हैसेकर यांनी केले.  विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्‍ह्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्‍णालये यांच्‍या प्रमुखांची बैठक आयोजि‍त करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, सहकार आयुक्‍त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ.सचिंद्र प्रताप सिंह, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्‍य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे मनपाचे आरोग्‍य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्‍यासह इतर तज्ञ, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


            प्रारंभी डॉ. म्‍हैसेकर यांनी खाजगी वैद्यकीय व्‍यावसायिकांकडे उपलब्‍ध असलेल्‍या सुविधांची माहिती घेतली. देशात कोरोना विषाणूचा उद्रेक होत असून त्‍याला वेळीच आळा घालण्‍यासाठी सोशल डिस्‍टन्सिंगप्रमाणेच वैद्यकीय उपचारांची गरज भासणार आहे. सुदैवाने परिस्थिती सध्‍या नियंत्रणात आहे. मात्र, भविष्‍यात विपरित परिस्थिती उद्भवली तर सर्वच यंत्रणांनी सज्‍ज असणे गरजेचे आहे, यासाठी साधनसामुग्रीसह इतर आवश्‍यक बाबींचा आढावा त्‍यांनी घेतला.


            विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्‍वीपमेंट), एन 95 मास्‍क तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्‍ध होण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. कोरोनाच्‍या रुग्‍णांवरील उपचारासाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करावी लागते त्‍यानुसार शासकीय तसेच खाजगी रुग्‍णालयात असलेल्‍या इंटेन्सि‍व्‍ह केअर यूनिट (आयसीयू), व्हेंटीलेटर याचीही त्‍यांनी माहिती घेवून आवश्‍यक ते प्रमाणे यंत्रणा सज्‍ज ठेवण्‍याच्‍या त्‍यांनी सूचना केल्‍या.


000