आजच्या युगात सुरक्षीत जीवनाचे धडे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे : जयपाल पाटील 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


आजच्या युगात सुरक्षीत जीवनाचे धडे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे : जयपाल पाटील

 

कर्जत दि. 28 गणेश पवार

 

          मातीला आकार हा ती घडत असतानाच द्यायला हवा त्याच पद्धतीने आजच्या युगात विद्यार्थ्यांना सुरक्षित जीवनाचे धडे महत्वाचे आहेत. व विद्यार्थी दशेतच ते त्यांना दिले गेले पाहिजे असल्याचे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी केले आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

            आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पा अंतर्गत कर्जत तालुक्यात चार निवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी पाथरज आश्रमशाळा येथे गुरुवार 27  फेब्रुवारी रोजी 10 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, शुभचिंतन सोहळा व यानिमित्ताने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, पाथरज शाळा मुख्याध्यापक रमेश चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयपाल पाटील यांनी सांगितले की आपल्या देशात वर्षाकाठी 1 लाखाच्या वर अपघात होतात. या अपघातात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याची बाब समोर आली आहे. त्यातही विनापरवाना गाड्या चालविणारे तरुण खूप आहेत. त्यामुळे शासनाने नियम कडक केले आहेत. तेव्हा आपल्याला वाहन चालवता येत असेल तरी परवाना मिळाल्यानंतरच वाहन चालवा. आपले जीवन अनमोल आहे. तसेच कुठेही अपघात झाला असल्याचे तसेच आपल्या घरात आजूबाजूला कुणा महिलेला प्रसूतीवेदना होत असतील तर 108 ही रुग्णवाहिका सेवा आपल्याला शासनाकडून मोफत मिळते. या रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व सहाय्यक उपलब्ध असतो. त्याचबरोबर औषधें सुद्धा या रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देण्यात आलेली असतात. यासह आज मराठी भाषा दिन असल्याने त्यांनी सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर यावेळी उपस्थित नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अविनाश पाटील म्हणाले की आजच्या काळात महिलांवरील घडत असलेल्या अत्याचाराच्या पार्शवभूमीवर महिलांची सुरक्षितता खुम महत्वाची झाली आहे. पोलीस विभाग सक्षम आहेच पण त्यासोबत महिलांनी सुद्धा आपण अबला नसून सबला आहोत हे दाखवून दिले पाहिजे. त्याचमुळे आम्ही शाळांमध्ये पोलीस काका व पोलीस मावशी ही संकल्पना सुद्धा सुरू केली आहे. तसेच आपल्याला शाळेत किंवा घरी जाताना कुणी छेडछाड करत असेल तर आपण निसंकोचपणे पोलिसांना या गोष्टीची माहिती द्या. जर आपल्याला भीती वाटत असेल तर शाळेत आपण तक्रार पेटी सुरू केली आहे. या पेटीमध्ये आपण तक्रार लिहून टाकू शकता. आपले नाव नाही टाकले तरी चालेल. आम्ही त्यावर त्वरित कारवाई करू. खांडस येथे नुकतीच एक घटना घडली होती. त्यात शाळेच्या आवारात खेळत असलेल्या लहान मुलीला खाऊचे आमिष देऊन पळवून नेले जात होते. त्यामुळे शाळेत किंवा घरी खेळत असताना कुणी अनोळखी काही खायला देत असेल तर घेऊ नका सतर्क व्हा. महिला मुली सशक्तीकरणासाठी आम्ही प्रशिक्षित ब्लॅक बेल्ट महिलांना शाळेत आणून त्यांच्याकडून मुलींसाठी प्रशिक्षण आयोजित करणार आहोत. तसेच दहावीचे वर्ष हे खूप महत्वाचे आहे. तेव्हा ट्रेन कुठली पकडायची हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. आपले ध्येय गाठण्यासाठी आपण आयुष्याचा योग्य ट्रॅक पकडला पाहिजे, 3 मार्च पासून परीक्षा सुरू होणार आहे तेव्हा अभ्यासाचा अति ताण घेऊ नका. कमी मार्क पडले म्हणून खचून जाऊ नका. कमी मार्क पडूनही अनेक जण आपल्या आयुष्यात धेयनिश्चिती गाठतात. तेव्हा आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरे जा असा मौलिक सल्ला पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.  

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*