बोल्टपेक्षा वेगाने धावला भारतीय तरुण? 100 मीटर अंतर कापलं 9.55 सेकंदात*

★★★पुणे प्रवाह न्युज पोर्टल★★


 


*बोल्टपेक्षा वेगाने धावला भारतीय तरुण? 100 मीटर अंतर कापलं 9.55 सेकंदात*


जगातला सर्वात वेगवान धावपटू म्हणून उसेन बोल्टला ओळखलं जातं. 100 मीटर अंतर कमी वेळेत कापण्याचा विश्वविक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे.


बंगळुरु, 14 फेब्रुवारी : जगातला सर्वात वेगवान धावपटू म्हणून उसेन बोल्टला ओळखलं जातं. 100 मीटर अंतर कमी वेळेत कापण्याचा विश्वविक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे. मात्र, सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात भारतीय तरुण उसेन बोल्टपेक्षा वेगाने धावल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटकातील म्हशी पळवण्याच्या स्पर्धेतील हा व्हिडिओ आहे. यामध्ये म्हशींना पळवणाऱ्याने त्यांच्यासोबत 142.50 मीटरचे अंतर 13.62 सेकंदात पूर्ण केलं. या अंतरावरून त्याचा वेग काढला असता तो उसेन बोल्टपेक्षा वेगानं धावल्याचं म्हटलं जात आहे.


कर्नाटकातील 28 वर्षीय श्रीनिविस गौडाने पारंपरिक म्हशी पळवण्याच्या शर्यतीत 30 वर्षांचा विक्रम मोडला. त्याशिवाय आता त्याची तुलना उसेन बोल्टच्या विक्रमासी केली जात आहे. बोल्टने 100 मीटर अंतर 9.58 सेकंदात पूर्ण केलं. गौडाने 142.50 मीटर अंतर 13.62 सेकंदात पूर्ण केलं. त्याच्या आधारावर 100 मीटर अंतरासाठी लागलेल्या वेळाचे गणित मांडले असता 9.55 सेकंद वेळ लागल्याचे दिसते. म्हणजेच बोल्टपेक्षा 0.3 सेकंद कमी वेळेत श्रीनिवासने 100 मीटर अंतर कापले.


कर्नाटकात म्हशी चिखलगुट्ट्यातून पळवण्याच्या या स्पर्धेला कंबाला असं म्हटलं जातं. मंगळुरु आणि उडुपी भागात या स्पर्धा भरवल्या जातात. अनेक गावांमध्ये या स्पर्धा पार पडतात.श्रीनिवास या कामगिरीबद्दल सांगताना म्हणतो की, मला ही स्पर्धा आवडते. या यशाचं श्रेय  माझ्या दोन्ही म्हशींना जायला हवं. त्या चांगल्या धावल्या. मी फक्त त्यांच्यासोबत धावलो.


म्हशींसोबत चिखलात धावूनही इतक्या वेगाने अंतर कापलेला श्रीनिवासचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी सरकारने त्याला प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिकसाठी तयार करावं असं म्हटलं आहे.