सुशिक्षित महिलांना साविञीचे भावपूर्ण पञ * """"""""""""""""""""""""""""""""""

* सुशिक्षित महिलांना साविञीचे भावपूर्ण पञ *
""""""""""""""""""""""""""""""""""
       
माझ्या प्रिय लेकींनो,
किती शिकल्यात गं तुम्ही ! कोणी डाॕक्टर,कोणी इंजिनियर,कोणी कलेक्टर,तहसिलदार,प्राध्यापक,शिक्षक,वकील,वैमानिक ! एवढेच नाही तर राष्ट्रपती,प्रधानमंञी,मुख्यमंञी,आमदार,खासदार सर्वच काही ! पुरुषांच्या तुलनेत कोणत्याच क्षेत्रात तुम्ही अजिबातही मागे नाही.उलट खूप पुढे आहे.खरंच मला तुमची ही प्रगती पाहून खूप खूप आनंद होतोय गं ! मी व माझ्या जोतिबांनी लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचा एवढा महावृक्ष होईल असे तेव्हा वाटले नव्हते.त्या काळात आम्हाला प्रचंड ञास झाला.खूप खस्ता खाव्या लागल्या.राञंदिवस संघर्ष व मरण हाती घेवून आम्ही हे पवित्र कार्य करीत होतो.सासऱ्यांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं.कोणीही राहायला जागा देत नव्हतं.तेव्हा उस्मान शेख नावाचा मुस्लिम बांधव समोर आला व त्याने फक्त जागाच नाही,तर संसाराला लागणारं सर्व साहित्यही दिलं.तेथून सुरु झालेलं शिक्षणाचं कार्य आज तुमच्या काळापर्यंत येवून पोहचतांना व तुमची झालेली शैक्षणिक प्रगती पाहतांना मला खूप खूप समाधान वाटत आहे.माझ्या व ज्योतीबांच्या कष्टाचे व त्यागाचे चीज झाले असे  मनोमन वाटायला लागले आहे.
                 माझ्या प्रज्ञावान लेकींनो,परंतु तुमची दुसरी बाजू जेव्हा मी पाहिली,ती तर खूपच वेदनादायी व चीड आणणारी आहे.मला तर प्रचंड धक्काच बसला हे सर्व पाहून ! आता तर वाटायला लागलं आहे की,कशाला मी माझा सुखी,समाधानी,आनंदाचा संसार उध्वस्त करुन तुमच्यासाठी विनाकारण शाळा काढत बसली ! तुम्हाला अडाणी, अशिक्षितच राहू दिलं असतं तर बरं झालं असतं असं आता मला वाटत आहे.माझ्या नव-याचे त्या काळातील वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये होते.मी अतिशय आनंदात सुखाने,तुमच्यासारखे ऐशोआरामी जीवन जगू शकले असते.परंतु हे सगळं सोडून मी तुमच्यासाठी जीवाचा आटापिटा करीत बसली.मला माझ्या कष्टाचे,अपमानाचे,वाईट दिवसाचे दुःख नाही.परंतु आज तुमच्यासारख्या उच्चविद्याविभूषीत,श्रीमंत महिलांचे वैचारीक मागासलेपण पाहून मला ज्या प्रचंड वेदना होत आहे त्या मी तुम्हाला सांगू सुध्दा शकत नाही.  
                      माझ्या शिलवान  मुलींनो,नवराञात ९ दिवस ९ रंगाच्या साड्या घालणे,उपवास करणे,पायात चप्पल न घालणे आणि वेगवेगळे व्रत वैकल्ये करुन स्वतःंच्या शरीराला क्लेश देणे म्हणजे सुशिक्षित होणे का गं ! जिजामाता,अहिल्याबाई,रमाबाई,फातिमाबी,ताराबाई,उमाबाई,तानूबाई,रुखमाबाई यांनी आपल्या महान कार्याने या देशाला दिशा दिली व सामर्थ्यवान बनविले.त्या महानायिकांच्या चरिञाचे वाचन जर या ९  दिवसात तुम्ही केले,तर लहान मुलामुलींना आपल्या महान स्ञियांचे कार्य माहित होवून प्रेरणा मिळेल.परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता नाचगाण्याशिवाय दुसरे काहीच  होतांना दिसत नाही.९ दिवस ९ रंगाच्या साड्यांवरील मोबाईल स्टेटस बदलण्याला माझा काहीच विरोध नाही.पण लोकांमधेही आपले सामाजिक स्टेटस वाढले पाहिजे यासाठी तुम्ही काही विधायक उपक्रम राबवाल की नाही गं ?
                माझ्या बुध्दीवान  पोरींनो, मी एक लुगडं अंगावर व दुसरे सोबत घेवून शाळेत शिकवायला जायची.कारण रस्त्याने लोक अंगावर शेण,माती,दगड,पाणी फेकायचे.तरीही न डगमगता मी फक्त तुमच्यासाठी हे सर्व सहन करत होती.परंतु अजूनही तुमची विद्येची देवता माञ काल्पनिकच आहे हे पाहून खरंच खेद वाटतो.माझ्या एका कवितेमधे मी म्हटले होते,"धोंडे मुले देती | नवसा पावती ||
लग्न का करती | नारी नर ||
परंतु अजूनही तुमचे नवस,उपास-तापास,बुवाबाजी,अंधश्रध्दा,कर्मकांड बंद झाले नाही.उलट शिक्षित व उच्चविद्याविभूषीत महिला यामधे जास्त गुरफटत चालल्या हे पाहून शिक्षण घेवूनही तुम्ही स्वतःंच्या मेंदूने का विचार करत नाही असा प्रश्न मला पडतो.कधी ९ दिवस ९ साड्या,कधी फक्त हिरव्या बांगड्या,कधी नारायण नागबळी,कधी मुहूर्त,तिथी,पंचांग,कधी भिंतीवर साईबाबा प्रगट झाले यासाठी गर्दी,कधी राधे माॕ तर कधी आसाराम,निर्मल बाबा,रामरहीम ! काय चालवलयं गं माझ्या सुशिक्षित लेकींनो ? याचसाठी मी प्रचंड विरोध पत्करुन तुम्हाला शिक्षण दिले होते का ? भौतिकदृष्ट्या तुम्ही किती आधुनिक झाल्या गं ! हायफाय कपडे,उच्च राहणीमान,खानपाण,सुखसुविधा सर्वकाही तुम्ही सहजपणे स्विकारलं, पण आधुनिक विचार तुम्ही का स्विकारत नाही ? वैचारीक दृष्ट्या तुम्ही एवढ्या मागास कशा गं ? काॕम्प्युटर,लॕपटाॕप,मोबाईल,गाडी,विमान,रेल्वे तुम्ही किती लिलया हाताळता ! तसेच विज्ञानाने निर्माण केलेल्या सर्व सुखसाधनांचा यथेच्छ आस्वादही  घेता ! मग तुमच्या डोक्यात माञ विज्ञान का शिरत नाही हीच आश्चर्याची बाब आहे.विज्ञानाची सृष्टी तुम्ही स्वतःंच्या स्वार्थासाठी ताबडतोब स्विकारली.परंतु विज्ञानाची दृष्टी माञ तुम्ही का अंगिकारत नाही हेच मला समजत नाही.मी एका कवितेत म्हटले होते,
"इंग्रजी शिकूनी | भेदभाव मोडा ||
भटजी भारुडा | फेकूनिया ||
             तुम्ही खूप चांगली इंग्रजी शिकल्या,फाडफाड fluent इंग्रजी बोलायला लागल्या.परंतु अजूनही भटजीला सोडायला माञ तयार नाही.तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट भटजी ठरवितो.स्वतःंच्या मुलामुलींचे नाव,लग्न जर आपण स्वतःं ठरवू शकत नसाल,तर आपण कितीही उच्च शिक्षण घेतले तरी अजूनही मानसिकदृष्ट्या गुलामच आहात असे मला वाटते.
                  माझ्या हशार लेकींनो,आज देशाला तुमची खूप गरज आहे.स्ञी ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे.कारण तिच्यामधे नवनिर्मितीची क्षमता आहे.पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या स्ञी समुहाला येथील धर्मव्यवस्थेने सर्व अधिकार नाकारुन गुलाम बनविले होते.परंतु अनेक महापुरुषांच्या त्यागामुळे आज तुम्ही जगामधे मुक्तपणे संचार करीत आहात.नावलौकीक मिळवित आहात.पण ज्या महानायकांनी तुम्हाला जनावरांपेक्षाही वाईट जीवनातून माणसात आणले, त्यांना विसरून तुमचे शोषण करणा-या बुवा,बापूंच्या तुम्ही मागे लागलेल्या आहात व त्यांच्या फसवणूकीला बळी पडत आहात हे पाहून माझा जीव तीळ तीळ तुटतोय गं ! तुमच्या घरात कोणाचे फोटो असावे हे सांगण्याचा मला काही अधिकार नाही.पण ज्यांच्यामुळे आपल्याला आनंदाचे दिवस आले,ज्यांच्यामुळे आज आमचे घर,गाडीच नाही तर आमच्या संडास-बाथरुम मधेही संगमरवरी दगड लागले,त्यांची एखादी १०० रुपयाची प्रतिमा आपल्या घरात असावी की नसावी या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यावरच सोडतो.प्लेगच्या रोग्यांना दवाखान्यात नेता नेता आपल्यालाही प्लेग होवू शकतो हे पूर्णपणे माहित असूनही मी जनसेवेसाठी मृत्यू ओढवून घेतला.निदान या गोष्टीची तरी तुम्ही थोडीफार का होईना जाणीव ठेवली पाहिजे अशी अपेक्षा केली तर तुम्ही माझ्यावर  रागावणार नाही ना मुलींनो ! 
                माझ्या गुणवान  लेकींनो,तुम्ही खूप विद्वान,बुध्दीवान आणि सक्षम आहात.तुमच्यामुळेच देश महासत्ता बनू शकतो हे सत्य आहे.त्यामुळे तुम्ही तुमची बुध्दीमत्ता निरर्थक व अंधश्रध्दायुक्त कामात वाया न घालता समाजशील कामासाठी जर खर्ची घातली तर भारत निश्चितच सुपर पाॕवर बनू शकतो, एवढी कार्यक्षमता तुमच्यामधे आहे याची मला पूर्ण खाञी आहे.तेव्हा आता तुम्ही सर्व सुशिक्षित महिलांनी भाकडकथा,अंधश्रध्दा व बुवाबाजीचे जोखड झुगारुन विज्ञानवादी विचारांची कास धरावी अशी तुम्हाला मी हात जोडून कळकळीची विनवणी करतो.तुम्ही खूप खूप मोठ्या व्हाव्यात व जगात तुमची किर्ती पसरून संपूर्ण भूतलावर तुम्ही अधिराज्य गाजवावे हीच तुम्हाला मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा . 


                                  तुमचीच
                                    साविञी
""""""""""""""""""""""""""""""""""