कोल्हारे ग्रामपंचायत निवडणूकी साठी प्रभाग रचना करण्यात तलाठ्यांची मनमानी...
प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वी त्याच्या प्रति जनतेकडे,
दोनदा तयार झाली यादी...
तहसीलदार यांनी लक्ष घालण्याच्या ग्रामस्थांची विनंती
कर्जत,दि. 9 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील 10 ग्रामपंचायती यांच्या मुदती जून 2020 मध्ये संपत असून त्या सर्व ठिकाणी मे 2020 मध्ये सार्वत्रिक निवडणूका होण्याची शक्यता आहे.त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचना अंतिम केली जात असून कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत मधील प्रभाग रचना करताना तेथील महसूल विभागाच्या तलाठी यांनी मनमानी केली असल्याचे दिसून येत आहे.अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांचे आदेशाने जाहीर होणार असताना आजच प्रस्तावित प्रभाग रचनेच्या प्रति एक महिना अगोदर सर्वत्र दिसून येत आहेत.त्याचवेळी त्या तलाठ्यांकडून दोन वेळा प्रभाग रचना केलेल्या प्रति जनतेच्या हातात असल्याने प्रभाग रचना दोनवेळा कशासाठी केली गेली?आणि प्रभाग रचना बनविताना गुप्तता पाळायची असताना ते सरकारी कागद जनतेकडे कसे काय?असे प्रश्न उपस्थित होत असून तहसीलदार यांनी ती अंतिम प्रभाग रचना समजू नये असे स्पष्टीकरण याबाबत कोल्हारे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांना दिले आहे.
कर्जत तालुक्यातील यावर्षी मे 2020 मध्ये काही ग्रामपंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत.त्या निवडणूक करिता राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडून पुरविण्यात आलेल्या गुगल मॅप नुसार प्रभाग रचना केली जात आहे.तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत मधील प्रभाग रचना तेथील महसूल विभागाच्या तलाठी मनीषा धोत्रे आणि ग्रामविकास अधिकारी गायकर यांनी केली आहे.त्यात सर्व अधिकार हे महसूल तलाठी यांना असून त्यांना याकामी मदत करण्याचे काम ग्रामविकास अधिकारी यांचे असते.30 डिसेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायत मधील प्रभाग रचना करून तो अहवाल कोणालाही कळणार माही याची गुप्तता पाळून तहसीलदार यांच्याकडे जमा करायचा होता.या कोल्हारे ग्रामपंचायतचे विभाजन होऊन ही दुसरी निवडणूक असून एकदा केलेली प्रभाग रचना ही दोन सार्वत्रिक निवडणुका यांच्यासाठी असते.मात्र असे असताना 2015 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना कायम न करता महसूल तलाठी धोत्रे यांनी 30 डिसेंबर 2019 रोजी नव्याने प्रभाग रचना केलेला अहवाल कर्जत तहसीलदार कार्यालयाकडे सादर केला.मात्र त्याआधी त्याच दिवशी त्या प्रभाग रचनेच्या प्रति या कोल्हारे ग्रामपंचायत मधील अनेकांकडे दिसून येत होत्या.त्या प्रभाग रचनेला काही राजकीय मंडळींनी हरकत घेतल्यानंतर तलाठी धोत्रे यांनी 31 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा नवीन प्रभाग रचना तयार केली आणि ती प्रभाग रचना केलेला अहवाल कर्जत तहसील कार्यालयात सादर केला.त्या दिवशी केलेल्या प्रभाग रचनेचा अहवाल देखील अनेकांच्या हातात दिसत असून राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 जानेवारी रोजी सादर प्रभाग रचना तहसीलदार यांच्या समोर निवडणूक आयोगाच्या आदेशाने गठीत केलेली समिती अंतिम करून तहसीलदार यांच्या सहीने रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यलयाकडे जात असते.शेवटी ती प्रभाग रचना रायगड जिल्हाधिकारी यांच्या सहीने 4 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार असून त्या प्रभाग रचनेला आक्षेप असल्यास 7 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारी पर्यँत हरकत घेण्यासाठी अवधी आहे.
मात्र प्रभाग रचना बनविणाऱ्या तलाठी धोत्रे यांनी आपल्या अखत्यारीत असलेला प्रभाग रचना सार्वजनिक केल्याबद्दल कोल्हारे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेतली.100 हुन अधिक ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीचे उपसभापती मनोहर थोरवे यांच्या सोबत तहसीलदार यांच्या भेटीत 10 वर्षे पूर्ण झाली नसताना दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगेच प्रभाग का बदलले जात आहेत?असा प्रश्न केला आहे.त्याचवेळी प्रभाग रचना करताना महसुली गाव एक ठेवता आले नसल्याने धामोते गावातील ग्रामस्थ यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट केले होते.त्याचवेळी 2011 च्या जनगणना नुसार लोकसंख्या प्रभाग रचना करताना ग्राह्य धरली जाणार आहे.मग 30 डिसेंबर 2019 ला प्रभाग निर्माण केल्यानंतर महसूल तलाठी यांना ते प्रभाग चुकीचे आहेत असा साक्षात्कार कसा झाला आणि त्यांनी 31 डिसेंबर रोजी पुन्हा प्रभाग रचना का केली?ती प्रभाग रचना करताना धामोते महसुली गावाच्या प्रभागात कोल्हारे महसुली गावातील भागाचा समावेश कोणत्या आधारे केला?आणि मुख्य म्हणजे कोणत्या आधारे प्रभाग रचना जाहीर करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने 4 फेब्रुवारी रोजी असताना 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी तलाठी यांच्या कडून प्रभाग रचनेच्या प्रति का दिल्या गेल्या?त्यात गुप्तता का पाळली गेली नाही?त्यामुळे त्या तलाठी यांच्यावर महसूल विभाग आणि रायगड जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार?
असे अनेक प्रश्न मनोहर थोरवे आणि महेंश विरले यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासमोर उपस्थित केले आहेत.त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थ हे प्रभाग रचनेबाबत माहिती घेण्यास गेले असता त्यांना तलाठी मनीषा धोत्रे या आपण प्रभाग रचना केली आहे,तुम्हाला मान्य नसेल तर मला त्याचे देणेघेणे नाही अशी उत्तरे देणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील कोल्हारे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी केली आहे.
गणेश गायकर-ग्रामविकास अधिकारी,कोल्हारे ग्रामपंचायत
प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी तहसील कार्यालयाने तलाठी यांना दिली होती.आपण फक्त सोबत राहून हद्द दाखविण्याचे काम केले आहे.त्यामुळे प्रभाग रचना वेळेआधी जाहीर झाली आहे काय?याची आपल्याला कोणतीही माहिती नाही.
मनीषा धोत्रे-तलाठी
आपण कोणालाही कोणत्याही प्रकारची प्रभाग रचना अहवालाची प्रिंट दिली नाही.आपण तहसील कार्यालयात अहवाल सादर केला असून तहसील कार्यालयातून त्यांच्या प्रति गेल्या असतील तर आपल्याला कोणतीही माहिती नाही.
विक्रम देशमुख-तहसीलदार
कोल्हारे ग्रामपंचायतची प्रभाग रचना अद्याप अंतिम झाली नाही.अजून माझ्यासमोर देखील आली नसून 10 जानेवारी रोजी ती माझ्या समोर येईल आणि त्यावेळी समिती समोर निर्णय होऊन अंतिम करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे.मात्र बाहेर कोणाकडे प्रति असतील तर ती अंतिम समजू नये.
मनोहर थोरवे-माजी उपसभापती, कर्जत पंचायत समिती
कोल्हारे ग्रामपंचायत मधील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आमच्या कडे आल्यानंतर आम्ही प्रांत आणि तहसीलदार यांना भेटायला गेलो.तेथे आम्ही महसुली गाव फोडुन प्रभाग बनविण्यास आक्षेप घेतला असून कोल्हारे ग्रामपंचायतचे विभाजन होऊन ही दुसरी निवडणूक 2020 मध्ये होणार असल्याने सलग 10 वर्षे झाली नसताना प्रभाग कसे आणि कोणत्या आधारे फोडले जात आहेत.त्याचवेळी या ग्रामपंचायतची मागील निवडणूक ही 2011 च्या जनगणना नुसार झाली होती आणि 2020 ची निवडणूक देखील त्याच जनगणना नुसार होत आहे.त्यामुळे लोकसंख्या वाढली हे कोणत्या आधारे तलाठी म्हणत आहेत आणि प्रभाग फोडत आहेत?याची चौकशी शासनाने करावी.