शाईचे पेन लेखक : अभय शरद देवरे

शाईचे पेन


लेखक : अभय शरद देवरे


आज हस्ताक्षर दिवस ! माझ्या हातात आज एक अँटिक शाईचे पेन आहे. शेवाळी रंगाचे, टोपण असलेले आणि शाई किती उरली हे कळण्यासाठी उभ्या खिडक्या असलेले. पूर्वी शाळेत असताना असे पेन सहज मिळायचे पण आता कुठेच मिळत नाही. नुसते असेच नव्हे तर शाईचे पेन ही संकल्पनाच आता कालबाह्य झाली आहे. सर्वप्रथम बॉलपेनने शाईच्या पेनाचे मार्केट खाऊन टाकले. नंतर बॉलपेनचे महत्व जेलच्या पेनाने कमी करून टाकले. आणि आता मोबाईलवर अंगठ्याने लिहिण्याच्या पद्धतीमुळे पेन हा प्रकार "पेनफुल" रित्या संपत चालला आहे. पूर्वीची माणसे म्हणे लिहितावाचता येत नसल्यामुळे आंगठेबहाद्दर होती, आणि आताची माणसे इंटरनेटवर शेकडो शब्द अंगठ्याने लिहीत असल्यामुळे त्या अर्थाने "अंगठेबहाद्दर"च म्हणायला हवीत. 
मला मात्र शाईचे पेन मनापासून आवडते. अगदी लहानपणापासून एखादी दौलत सांभाळावी तशी अनेक शाईची पेने सांभाळून वापरली. मुळात गम्मत अशी की पेन ही हरवण्याची आणि शाई ही सांडायचीच गोष्ट आहे. जरा आठवून पहा, शाईच्या दौतीतली किती शाई लिहिण्यासाठी खर्च होते आणि किती सांडण्यात वाया जाते ? पण शालेय जीवनात या गोष्टी सहज घडतात. अनेकवेळा एखाद्याची फिरकी घेण्यासाठी आपण त्याच्या पांढ-या शर्टाच्या मागे शाईचे पेन झटकून नक्षी काढतो. किंवा ब-याचवेळा शाई संपत आली की पेनातून कशी कोणास ठाऊक पण ती उसळून बाहेर पडते आणि आपला खिसा निळा करते. मग "मेल्या शर्ट धुवून धुवून हात मोडले माझे....फेकून दे ते पेन...." असा आईने केलेला सत्कार सगळ्यांनीच स्वीकारलेला असतो. सकाळी शाळेत जाताना स्वच्छ असलेल्या हातांवर शाळेतून परतताना पेनातून गळलेल्या शाईने केलेली मेहेंदी पहिली की पुन्हा आई कडाडते, " हात स्वच्छ धुवून ये आधी मग भूक भूक कर." 
शाईचे पेन ही खरे तर ढकलगाडी सारखी असते. टोपण उघडल्यावर बॉलपेनसारखे त्याने लगेच लिहिता येत नाही. आतली शाई निबेवर लगेच येत नाही. मग आपण वहीचे मागचे पान काढतो आणि त्यावर झटकतो. त्यामुळे वहीवरील पहिल्या पानावर घरातील ज्याचे अक्षर सुंदर असेल त्याने आपले नाव, शाळेचे नाव, इयत्ता, विषयाचे नाव आदी माहिती लिहिलेली असते तर त्याच वहीच्या शेवटच्या पान शाई झटकून झटकून काळीनिळी पडलेली असते. त्यामुळे जर वर्गशिक्षकांनी वही तपासायला मागितली की त्यांनी सर्व वही तपासावी पण शेवटचे पण उघडू नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत असतो. आपल्याला माहीत असते की शेवटचे पान त्यांनी पाहिले की ते, "अरे गाढवा, वहीवर हागलायस किती ?" या शब्दात ते उद्धार करणार ! शाईच्या पेनाने इतका जरी त्रास दिला तरी आपण त्यावर प्रेमच केले कारण तशाच कोणत्यातरी पेनाने आपण सर्वप्रथम श्री गणेशाय नमः लिहिले होते. नंतरच्या आयुष्यात अनेक प्रकारची पेने वापरली असतील पण शाईच्या पेनामुळेच आपले अक्षर वळणदार झाले होते ते आपण विसरू शकत नाही. सुंदर अक्षर हा सुंदर मनाचा दागिना आहे. त्या दहा रुपयाच्या पेनाने जो दागिना आपल्याला त्यावेळी दिला तो नंतर कधीच कोणत्या पेनाने दिला नाही. दहावीपर्यंत खरोखरच सगळ्यांची अक्षरे चांगली असायची. कारण आपल्या त्यावेळच्या शिक्षण पद्धतीत सुरुवातीला लाकडी बोरूने लिहिणे व नंतर शाईपेनाने लिहिणे अनिवार्य होते. त्यामुळे आपोआप आपल्यावर सुंदर हस्ताक्षराचा संस्कार घडत गेला. मात्र हे सुख आजच्या पिढीला मिळत नाही, कधीच मिळणार नाही. कारण आताच्या पिढीच्या हातात शाईपेन नाही तर टॅब आहेत. त्यामुळे ही मुले आत्तापासूनच हाताने लिहिण्याच्या सुखापासून वंचित रहात आहेत. 
एखादे स्पेलिंग चुकले तर ते शंभरवेळा लिहायची शिक्षा मिळायची ते आठवतंय का ? बोटे दुखून येईपर्यंत चुकलेले शब्द लिहिताना आपण शिक्षकांना शिव्या घालायचो पण ते शब्द आज इतके मेंदूत रुतून बसलेत की आता ठरवूनही चुकत नाहीत. आमचे गुरुजी सांगायचे की मुलांनो, वाचण्यापेक्षा लिहीत जा, कारण एकदा लिहिणे म्हणजे तीनवेळा वाचणे असते. त्यावेळी त्यांच्या सांगण्याचे महत्व कळायचे नाही. आपण गणितासारखा विषयही वाचून संपवलेला असतो. मग त्या विषयात कमी गुण मिळत हे ओघानेच आले !
मला चांगले आठवते की माझ्या वडिलांनी एक दिवस 'बर्गे सुलेखा स्लेट' म्हणून दोन प्लॅस्टिकच्या पाट्या विकत आणल्या. त्यात एकीत मराठी अक्षरे आणि दुसरीत इंग्रजी अक्षरे कोरलेली होती. त्यात पेन्सिल घालून फिरवले की अक्षर आपोआप सुंदर होत असे. वडिलांनी नियमच केला की आजपासून रोज मराठी पाटी पाच वेळा आणि इंग्रजी पाटी पाचवेळा गिरवायलाच पाहिजे. नाहीतर रात्रीचे जेवण मिळणार नाही. मी ते काम करतो की नाही ते पाहण्यासाठी माझ्या पाटच्या बहिणीला सांगितले आणि ती गिरवते की नाही हे पाहण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. असा राग आला होता आम्हाला त्यांचा... पण करणार काय ? तिथे माफी नव्हती. पण आज समजते की आम्हा दोघांचीही अक्षरे आणि मने त्या पाट्या गिरवल्यामुळे सुंदर बनली. 
हे सगळे आज आठवण्याचे कारण अनेक दिवस सांभाळलेले शाईचे पेन परवा कुठेतरी हरवले आणि मी सैरभैर झालो. आजही जिथे जमेल तिथे मी काळ्या शाईच्या पेनाने लिहितो. कारण ते पेन मला भूतकाळात घेऊन जाते, थेट शाळेत नेऊन बसवते. व्यवसायाच्या निमित्ताने जे लिखाण करावे लागते ते नाईलाजाने बॉलपेननेच करावे लागते. कारण दुकानात बिले करताना शाईचे पेनाने लिहिल्यास कार्बनपेपरच्या खाली काही उमटत नाही. आणि नंतर कॉम्प्युटरवर बिले करण्यामुळे लिहिण्याची तीसुद्धा सवय मोडली आणि अक्षरही बिघडले. ते पुन्हा सुवाच्च करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा शाईचे पेन वापरायला सुरुवात केली. पूर्वीईतके नव्हे पण अक्षर ब-यापैकी सुधारले. पण परवा ते पेन हरवले आणि मला धक्का बसला कारण आजकाल शाईची पेने बनणेच बंद झालंय म्हणे ! जी थोडीफार विकली जातात ती शाईच्या कारटेजची पेने. पण मला हवे होते ते पूर्वीसारखे हाताने शाई भरण्याचे पेन ! दहाबारा दुकानात विचारले तर सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला लागले. "आजकाल मुले शाईची पेने वापरतच नाहीत साहेब, मग आम्ही का ते ठेवायचे ?" असे सगळ्यांनी सांगितले. शेवटी एका दुकानात अनेक वर्षे गि-हाईकाची वाट बघत असलेले ते एकुलते एक अँटिक पेन दिसले. आणि आनंदातीशयाने त्यावर झडपच घातली मी ! पण आज महत्प्रयासाने पेन मिळाले खरे पण काही महिन्यांनी दुकानदार मला सांगणार की आता पेनाची शाईच नत नाही आणि निब, जीबळी तयार करणारे करखाने बंद पडले. मग मी शाईच्या पेनाने कसे लिहिणार ? मन सुंदर बनवणारी सुंदर हस्ताक्षराची संस्कृती संपूर्णपणे लयाला गेल्याचे याची देही याची डोळा पाहण्याचे नशिबी आले. नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना जुन्या ज्ञानाची कवाडे आपोआप बंद होताहेत आणि त्याचे कोणालाही दुःख होत नाही हे जास्त क्लेशकारक वाटते. मुलांच्या हातात टॅब जरूर पाहीजेत पण हाताने लिहिण्याचे सुखही त्यांनी अनुभवायला हवे. आतातर ब-याच परीक्षा इंटरनेटवर ऑनलाइन होतात. मग अशाने भविष्यात हाताने लिहिणे हे पूर्णच बंद होईल हो ! पूर्वीची तरुण पिढी प्रेमपत्र लिहायची. त्यासाठी खास गुलाबी रंगाचे कागद मिळायचे  त्यावर प्रेमाने ओथंबलेले शब्द लिहिताना सर्वजण हरवून जायचे. पण आज मोबाईलवरील इंटरनेटने प्रेमपत्राचे नाजूक अनुभव संपवले. आता प्रेमाचा इजहार करताना I O U ही तीनच अक्षरे वॉट्सअप केली जातात. Love हा शब्दही संपूर्ण लिहिला जात नाही. मग त्या अक्षरात कुठे आला प्रेमाचा ओलावा ? कुठे आलीय हुरहूर, कुठे आलेत प्रतिक्षेचे क्षण काळासारखे घालवणे ? पेनाने लिहिणे संपले आणि ते आनंदही संपले ......कायमचे !
तरीही हे पेन मात्र मी जीवापाड जपणार आहे, जेवढे जमेल तेवढे लिहिणार आहे कारण पुन्हा कधी दुकानात शाईपेन असणार नाही, असे जुन्या पद्धतीचे तर नाहीच नाही ! कदाचित यापुढे अशी पेने व हस्ताक्षर वस्तुसंग्रहालयात काचेच्या पलीकडे पाहायला मिळतील आणि खाली कॉम्प्युटरचा प्रिंटआउट असेल की " कोणे एके काळी माणूस लिहिण्यासाठी दोन बोटांचा आणि मनगटांचा वापर करीत असे आणि कागद या दुर्मिळ वस्तूवर पेन नावाच्या त्याहूनही दुर्मिळ वस्तूने लिहीत असे...." हे वाचायला आता खूप काळ काही जावा नाही लागणार !


©अभय शरद देवरे
      सातारा