कर्जत तालुक्यातील नाण्याचा माळ येथील शाळेला इमारत नाही.. शाळा भरते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे घरात.. तर एक शिक्षिका चार महिन्यापासून शाळेत आल्याच नाहीत




कर्जत तालुक्यातील नाण्याचा माळ येथील शाळेला इमारत नाही..

शाळा भरते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे घरात..

तर एक शिक्षिका चार महिन्यापासून शाळेत आल्याच नाहीत

कर्जत,दि. 10 गणेश पवार

                कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील आसल ग्रामपंचायत मध्ये असलेल्या नाण्याचा माळ येथे असलेली रायगड जिल्हा परिषदेची शाळा स्वतःची इमारत नसल्याने अनेक वर्षे एका घरात भरविली जात आहे.पनवेल येथून बदली होऊन आलेल्या शिक्षिका या त्या शाळेतील गेली चार महिने आल्याच नाहीत. दरम्यान,शाळेच्या इमारतीचा आणि शाळेवर मंजूर पटनुसार असलेला शिक्षक न आल्यामुळे आदिवासी धनगर समाजाच्या ग्रामस्थ यांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

                माथेरानच्या डोंगर रांगेत दुर्गम भागात आसल ग्राम पंचायतमध्ये नाण्याचा माळ ही धनगर समाजाची वस्ती असलेले वाडी आहे.40 घरांची वस्ती असलेल्या वाडीमधील मुलांना शाळेत बेकरेवाडी येथे तीन किलोमीटर चालत जाऊन जावे लागू नये यासाठी स्थानिक आदिवासी ग्रामस्थ यांच्या पाठपुरावा मुळे येथे इयत्ता पहिला ते चौथी पर्यंतची शाळा रायगड जिल्हा परिषदेने मंजूर केली.2013 पासून नाण्याचा माळ मध्ये जिल्हा परिषद शाळा भरत असून त्या शाळेत आता 23 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाने दोन शिक्षक यांची नियुक्ती केली आहे.मे 2019 रोजी त्यातील एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदने केलेल्या शिक्षक समायोजन मध्ये पनवेल येथील ज्योती बाळासाहेब कोलते यांना ऑनलाईन मध्ये कर्जत तालुक्यातील नाण्याचा माळ ही शाळा मिळाली.त्यावेळी जुलै 2019 मध्ये बदली झालेल्या शिक्षिका यांनी हजर होणे आवश्यक होते.मात्र त्या नाण्याचा माळ येथे सप्टेंबर 2019 रोजी आल्या आणि त्यांनतर आतापर्यंत फक्त तीन दिवस आल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून तेथे असलेले मुख्याध्यापक मोरे यांना इयत्ता पहिली ते चौथी पर्यतच्या मुलांना शिकविण्याची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे मागील वर्षात या गावातील आदिवासी आणि धनगर समाजाच्या ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समिती मध्ये जाऊन शिक्षक येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.तर गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांना ग्रामस्थांचे वतीने दिलेल्या निवेदनात जानेवारी महिन्यात नवीन शिक्षक किंवा शाळेत नियुक्ती झालेल्या ज्योती कोलते या हजर न झाल्यास शाळा बंद करण्याचा इशारा बाळा सांबरी यांनी दिला आहे. 

               मात्र या शाळेची आणखी एक मोठी समस्या असून शाळेला अद्याप जिल्हा परिषदेची इमारत नाही.2013 पासून तेथील जेष्ठ ग्रामस्थ झिमा आखाडे यांच्या घरी शाळा भरवली जात असून शाळेच्या इमारती साठी तेथील दळी भूखंड देखील देण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली होती.मात्र कर्जत पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियान ने आतापर्यंत त्या शाळेच्या इमारत मंजुरीसाठी निधी मंजूर केला नाही.शाळेची स्वतःची इमारत व्हावा आणि महिला शिक्षिका यांची बदली करून पुरुष शिक्षक देण्याची मागणी करणारे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.त्या निवेदनावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष झिमा कोंडू आखाडे,तसेच ग्रामस्थ नागेश गोरे,योगिता गोरे,शोभा आखाडे,लक्ष्मण गोरे,राजेश गोरे,बाळा संबरी तसेच सर्व 40 ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.

                   याबाबत शिक्षण विभागाचे शरद म्हसे-केंद्रप्रमुख यांनी नाण्यांचा माळ येथील शाळेत आंतर बदली होऊन आलेल्या ज्योती कोलते या शिक्षिका हजर झाल्यानंतर पुन्हा शाळेत आल्या नाहीत.आम्ही आमचा अहवाल दिला असून त्या शाळेत आणखी एक शिक्षक द्यावा असे देखील अहवालात सूचित केले आहे.तर ग्रामस्थ बाळा सांबरी यांनी आम्ही सातत्याने शिक्षकाबाबत कर्जत पंचायत समिती ला सूचित करीत आहोत,पण त्या शिक्षिका किंवा बदली शिक्षक दिला जात नाही.त्यामुळे आमच्या सहनशीलता यांचा अंत होऊ लागला असून या महिन्यात शिक्षक न आल्यास आम्ही शाळा बंद करू असा इशारा दिला आहे.कर्जत पंचायत समिती चे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी आपल्याकडे ग्रामस्थ आले होते आणि त्यांना आम्ही शांत केले असून बदली होऊन आलेल्या महिला शिक्षकाने हजर व्हावे असे निर्देश आपल्या कार्यालयाने दिले आहेत.आता त्या शिक्षिका हजर न झाल्यास आम्ही जिल्हा परिषदेचकडे त्यांच्या वर कारवाई करण्याची शिफारस करणार आहोत अशी माहिती दिली.