अखेर काँग्रेसच्या खात्यातील खातेवाटपाचा घोळ मिटला

अखेर काँग्रेसच्या खात्यातील खातेवाटपाचा घोळ मिटला
__________________________________


महाआघाडीचं गेल्या 5 दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळ खातेवाटप आज जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या खात्यातील खातेवाटपाचा घोळ मिटला असून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाआघाडी सरकारच्या एकूण 42 मंत्र्यांचे खातेवाटप जाहिर करणार असल्याची माहिती सुत्रांनी मध्यरात्री उशिरा लोकमतशी बोलताना दिली. शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी तयार असून काँग्रेसच्या यादीमुळे मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर करण्यास उशीर झाल्याचे समजते. शिवसेनेला 12 मंत्रीपदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 14 मंत्रीपदे व काँग्रेसला 10 मंत्रीपदे असे एकूण 42 मंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांचे महाआघाडीचे जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वाट्यातील 10 मंत्र्यांच्या खाते वाटपाला रात्री उशिरा मान्यता दिली आहे.


 बाळासाहेब थोरात-महसूल,  अशोक चव्हाण-सार्वजनिक बांधकाम, नितीन राऊत-ऊर्जा, अस्लम शेख वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे, वर्षा गायकवाड-शालेय शिक्षण, के.सी.पडवी-आदिवासी विकास, अमित देशमुख-उच्च शिक्षण, सुनील केदार-वैद्यकीय शिक्षण, विजय वडेट्टीवार-दुग्ध विकास व पशुसंवर्धन, यशोमती ठाकूर-महिला व बालकल्याण आदी खाती काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत.