स्व. अॅड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने डॉ. माशेलकर,  पाटील, गडाख आणि जोशी सन्मानित

स्व. अॅड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने डॉ. माशेलकर,  पाटील, गडाख आणि जोशी सन्मानित
राजकीय उलथापालथीच्या काळातही रावसाहेबांचे विचार मार्गदर्शक
- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य


पुणेः- अण्णासाहेब आणि रावसाहेब शिंदे यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न व्यक्तींच्या सहवासामुळे आम्ही आज राजकीय क्षेत्रात काही कार्य करु शकत आहोत. गेल्या तीन महिन्यात राज्याच्या राजकीय क्षेत्रात जी  उलथापालथ झाली त्यावेळी आम्ही निर्णायक आणि संयमी भूमिका घेऊ शकलो, त्यामागे अण्णासाहेब आणि रावसाहेबांनी केलेल्या संस्कारांचा वाटा होता, असे मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. 


येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि विचारवंत अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा स्व.अॅड.रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार श्रीनिवास पाटील, प्रशांत गडाख आणि प्रा. मिलिंद जोशी यांना आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी थोरात बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक कीर्तीचे विचारवंत आणि स्टॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, श्रीमती शशिकला रावसाहेब शिंदे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल, 
खासदार श्रीनिवास पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि प्रशांत गडाख यांना यशवंतराव सामाजिक प्रतिष्ठानतर्फे 'गाव तिथे ग्रंथालय चळवळ' या  विशेष कार्याबद्दल अॅड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 


यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अण्णासाहेब शिंदे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आपल्या भावाचा हात धरून आपणही राजकारणात पुढे यावे, अशी भूमिका न घेता रावसाहेबांनी अण्णासाहेबांनी केलेले सामाजिक कार्य पुढे नेण्याचा ध्यास घेतला. राजकीय लाभापोटी भाऊ-भाऊ एकमेकांविरोधात उभे राहत असल्याचे चित्र आपण नेहमीच पाहतो. त्या परिस्थितीत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक आदर्श उदाहरण रावसाहेब आणि अण्णासाहेबांनी आपल्या विचार कार्यातून प्रस्थापित केले. संगीत, साहित्य, राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गजांशी रावसाहेबांचे ऋणानुबंध होते. त्यांनी  विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात काम करावे, यासाठी त्यांना खूप मोलाची मदत केली. त्यांना उभे केले. 
'त्या घडामोडीं'वर पुस्तक लिहावे..
राज्यात गेल्या तीन महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडी अतिशय नाट्यमय आणि धक्कादायक होत्या. तसेच  विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या होत्या. या सगळ्यावर एक चांगले पुस्तक लिहिता येऊ शकते. त्यासाठी निश्चितच कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा, असेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.  


यावेळी बोलताना डॉ. संदीप वासलेकर म्हणाले की, रावसाहेब शिंदे यांची ज्ञानेश्वरीवर भक्ती होती, तशीच त्यांना विज्ञानाची आसक्ती होती. ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वराकडे प्रवास कसा होईल, यासाठी ते सतत कार्यशील असायचे.  रावसाहेबांचे व्यक्तिमत्त्व चिंतनशील होते आणि त्यामुळे त्यांनी तळागाळातील अनेक व्यक्तींना हात देऊन त्यांना आभाळापर्यंत नेण्याचे कार्य केले. आभाळातील व्यक्तींचा तळागाळातील व्यक्तींशी संवाद घडवून आणला. यांच्यातील दरी मिटवण्याचे काम केले. विज्ञानाची कास धरलेल्या रावसाहेबांच्या नावाने एखादी विज्ञाननगरी उभी राहायला हवी, अशी अपेक्षाही वासलेकर यांनी यावेळी व्यक्त केली.


यावेळी बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, रावसाहेब शिंदे म्हणजे सोज्वळ प्रतिभा आणि उच्च नैतिक आचरण असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेचा वेल आता गगनात भीडला असून त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.  ते निस्पृह समाजसेवक होते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते शतकानुशतके अनेक पिढ्यांच्या निश्चितपणे लक्षात राहतील.


यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील यांनी रावसाहेब शिंदे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. रावसाहेबांमुळे मला लोकशाहीची मूल्ये मिळाली, असेही ते म्हणाले. 


यावेळी प्रा.मिलिंद जोशी आणि प्रशांत गडाख यांनी देखील मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. 


छायाचित्र ओळीः-येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि विचारवंत अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा स्व.अॅड.रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांचे वितरण आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी (डावीकडून)  सचिन ईटकर, प्रशांत गडाख, डॉ. संदिप वासलेकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, थोराक, खासदार श्रीनिवास पाटील, प्रा. मिलिंद जोशी,  श्रीमती शशिकला रावसाहेब शिंदे आणि मधुकर भावे.