बिहारप्रमाणे राज्यातही बोगस हॉस्पिटल; ना डॉक्टर ना पेशंट, बोटांचे ठसे बनवून डॉक्टरांची हजेरी
_____________________________________
भावी डॉक्टर घडविणाऱ्या शिक्षकांची हजेरी लावण्यासाठी बोटांच्या ठशांच्या साच्यांनी (मोल्ड) केल्याचे, अॅडमिट केलेले रुग्ण दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे इस्लामपूरच्या प्रकाश इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरच्या चौकशीत आढळून आले आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) डोळ्यात धूळ झोकून हा प्रकार चालू होता. त्यामुळे सदर कॉलेज चालवण्याची परवानगी व प्रमाणपत्र रद्द करावे, पुढचे प्रवेश थांबवावेत, अशी शिफारस समितीने केल्याचे सांगण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, जे.जे. हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संजय बिजवे व जी.एस. मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव सातोसकर यांच्या समितीने हे सगळे प्रकार डोळ्यांनी पाहिले. तेथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे ही समिती नेमण्यात आली होती. चौकशी करण्यासाठी ती इस्लामपूरला गेली, तेव्हा त्यांना इन्स्टिट्यूटच्या डीन डॉ. वृशाली वाटवे यांनी पाहणीही करू दिली नाही. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार डॉ. लहाने यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली.
बिहार, उत्तरप्रदेशात शोभून दिसावे असे मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे उघडकीस आले आहे. तक्रारींनंतर वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी डॉ. लहाने यांना चौकशीचे आदेश दिले होते.
समितीने मुखर्जी यांना पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘आम्ही पाहणीस गेलो असता आम्हाला सहकार्य मिळाले नाही. डॉ. बिजवे तिसºया मजल्यावर गेले, तेव्हा औषधशास्त्राच्या ४ वॉर्डांना कूलूप होते. समितीने त्याचे फोटो घेतले. मुलांसाठीच्या तीनपैकी दोन वॉर्डांनाही कूलूप होते. जो उघडा होता, तिथे रुग्णच नव्हता. आठ खाटांच्या डर्मेटॉलॉजी वॉर्डातही पेशंट नव्हते. तिथे डॉ. बिजवे यांना तपासणीपासून रोखण्यात आले, तर डॉ. सातोसकर यांना अस्थिव्यंग व शस्त्रक्रिया विभागात दोन रुग्ण व दोन नर्सेस दिसल्या. त्यांची चौकशी करण्यापासूनही मज्जाव करण्यात आला.’
डॉ. लहाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विद्यार्थी तीन महिने तक्रारी करीत होते. एमसीआयकडे येथील डॉक्टर, प्रोफेसर, प्राध्यापकांची बायोमेट्रिक नोंद होते. पण डॉक्टरांच्या फिंगर प्रिंट्सचे मोल्ड बनवून, त्याद्वारे त्यांच्या हजेºया दाखवल्या जात होत्या. अशा सुमारे ४० डॉक्टरांच्या बोटांचे मोल्ड तपासणीतून उघड झाली आहे.
जे रुग्ण अॅडमिट आहेत असे दाखवले होते. त्यांचे पत्ते घेऊन आसपासच्या १०० गावांमध्ये विद्यार्थ्यांनी चौकशी केली असता तेथील सरपंचांनी असे कोणी आमच्या गावात राहत नाहीत, असे त्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी या बाबी तक्रारीत नमूद केल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.
संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी चौकशी समितीला ४५ मिनिटे बसवून ठेवले. डीन डॉ. वृषाली वाटवे यांनी कागदपत्रांची शहानिशा करण्यास परवानगी नाकारली.
व्यवस्थापनाच्या वतीने आम्ही एक पत्र देऊ, असे त्या म्हणाल्या. नंतर संस्थेचे अध्यक्ष निशिकांत प्रकाश भोसले पाटील आले. त्यांनीही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तपासणीस परवानगी देणार नाही, असे समितीला सांगितले.