सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती ही चळवळ होणे काळाची गरज – महापौर उषा उर्फ माई ढोरे
पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) – जागतिक तापमानवाढ ही चिंतेची बाब असल्यामुळे मानवी जीवाला सुसह्य तापमान राहावे यासाठी सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. वाढलेल्या तापमानाचे सुसंधीत रुपांतर करणे गरजचे आहे. काही शासकीय कार्यालयांवर सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचे छोटे-छोटे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनीही सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती करून स्वतःच्या घरातील विजेची गरज भागविणे काळाची गरज आहे. त्यासाठी सौर ऊर्जेतून वीज निर्मिती ही चळवळ होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मंगळवारी (दि. ७) केले.
चिंचवड, ऑटोक्लस्टर शेजारील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या छतावर सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी मदनमोहन साळवी, महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, नंदकुमार कासर, अल्फा लावल कंपनीचे उपाध्यक्ष निशांत श्रीवास्तव, सीएसआर प्रमुख ललिता वासू आदी उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे पुढे बोलताना म्हणाल्या की, “गेल्या काही दशकांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा या इंधनांच्या वापरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडसारख्या वायूंच्या उत्सर्जनामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे राहिले आहे. आजच्या युगात विजेशिवाय पर्याय नाही. वीज निर्मितीसाठी कोळशाची गरज पडते. कोळसा जाळून वीज निर्माण करताना होणारे प्रदूषण, जंगलांची होणारी हानी या सगळ्याचा विचार करता कोळसा हा वीजनिर्मितीचा सगळ्यात काळाकुट्ट पर्याय आहे. वीज नसली की प्रत्येकजण अस्वस्थ होत असतो. वीज गेल्यास घरात अडचण होऊ नये यासाठी इन्व्हर्टरचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. परंतु, याला पर्याय म्हणून अक्षय ऊर्जा असलेल्या सौरऊर्जेवरील उपकरणांचा वापर वाढण्याची गरज आहे.
त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांना सौर ऊर्जा निर्मिती बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होतेच असे नाही. महापालिकेने आपल्या सर्व मिळकतींवर लवकरात लवकर सौर ऊर्जेतून वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करावेत. त्याचप्रमाणे नागरिकांनीही सौर ऊर्जेतून वीजनिर्मितीचे छोटे-छोटे प्रकल्प सुरू करणे काळाची गरज आहे. सौर ऊर्जेतून वीजनिर्मितीचे प्रकल्प उभारल्यास नागरिकांना कोणतेही वीजबिल भरावे लागणार नाही. सौर ऊर्जेला प्राधान्य दिल्यास निसर्गातील झाडांची तोड थांबू शकेल. त्यामुळे पर्यावरण ऱ्हासालाही आळा बसेल. त्यामुळे सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती ही चळवळ होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.”
दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील सौर उर्जा प्रकल्पासाठी अल्फा लावल इंडिया प्रा.लि.या कंपनीने सीएसआर फंडातून मदत केली आहे. सुमारे ३० लाख रुपये खर्चाचा हा संपूर्ण प्रकल्प आहे.