नेरळ-माथेरान घाटात संरक्षक भिंतींचे नित्कृष्ट काम ...
अपघात होण्याची शक्यता
एमएमआरडीए कडून ठेकेदारावर मर्जी
कर्जत,दि .31 गणेश पवार
माथेरान या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण मागील वर्षात करण्यात आले आहे.मात्र या रस्त्यावर वाहनांच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतींचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून त्या भिंती कधीही कोसळू शकतात अशा स्थितीत आहेत. त्यामुळे घाटरस्त्यावर अपघाताची स्थिती निर्माण झाली असून प्रवासी गाडी जाताना त्यातून संरक्षक भिंत कोसळल्याने मोठा अनर्थ घडू शकतो. दरम्यान, माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहून लक्ष घालण्याची सूचना केली आहे मात्र एमएमआरडीए कडून ठेकेदारांची मर्जी सांभाळली जात असल्याचे दिसून येत आहे.
नेरळ-माथेरान हा घाट रस्ता मध्य रेल्वेचा संप झाला त्यावेळी माथेरानच्या नागरिकांनी श्रमदान करून बनविला होता.त्या अरुंद रस्त्याचे सुरुवातीला 1999 मध्ये कोकण पॅकेज च्या माध्यमातून तर 2018-19मध्ये एमएमआरडीए च्या माध्यमातून रुंदीकरण करण्यात आले आहे.नेरळ हुतात्मा चौक ते दस्तुरी नाका या 7 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी तब्बल 28 कोटी रुपयांची तरतूद केली होती.तर एमएमआरडीए ची मर्जी सांभाळणाऱ्या ठेकेदाराला निविदा देताना चढ्या भावाने देऊन त्याचे आर्थिक फायदे देखील पाहिले गेले होते.त्या निविदेत एमएमआरडीए कडून रस्त्याच्या कडेला गार्डन उभारले जाणार होते,मात्र कामे संपून गेली तरी गार्डन उभारले गेले नाही.वाहनांना सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या होत्या.मात्र त्या बांधताना ठेकेदाराने चपलासी केली आणि घाटरस्त्यात ज्या जुन्या संरक्षण भिंती बांधल्या होत्या,त्या भिंतींवर नवीन भिंतींचे बांधकाम केले गेले.नवीन भिंती बांधताना कुठेही जमिनीत खोदकाम केले गेले नाही.त्याचवेळी लोखंड देखील वापरले गेले नसताना सिमेंट चे बांधकाम केल्यानंतर कुठेही पाण्याचा वापर कामे मजबूत होण्यासाठी केला गेला नाही.त्यामुळे कोणत्याही घाट रस्त्यात महत्वाची समजली जाणारी संरक्षक भिंत यांचे बांधकाम हे केले जात असताना स्थानिकांनी तसेच नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष संतोष शेळके यांनी जोरदार आक्षेप घेतला होता.मात्र आंदोलन करून देखील केवळ एमएमआरडीए च्या अधिकारी वर्गाची असलेली मर्जी लक्षात घेऊन संरक्षण भिंती यांची कामे जशी सुरू होती तशीच पुढे केली गेली आहेत.
स्थानिकांनी आरडाओरड करून देखील नेरळ-माथेरान घाटरस्त्याचे काम एमएमआरडीए कडून नेमलेला ठेकेदार बिनधास्तपणे करीत होता.याबाबत आता काही महिन्यातच जुन्या संरक्षण भिंतींवर बांधण्यात आलेल्या भिंती या कोसळण्याच्या स्थितीत आल्या आहेत.या भिंती कोसळून रस्त्यावर येऊ शकतात यामुळे अधिक भिती वाहनचालक आणि प्रामुख्याने माथेरान पर्यटकांना सुखरुप घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालक यांना वाटू लागली आहे.टॅक्सी चालक हे घाट रस्त्याने 24 तास सेवा देत असतात आणि त्यावेळी अचानक एखादी संरक्षण भिंत येऊन कोसळल्यास मोठा अनर्थ घडू शकतो.ही बाब लक्षात घेऊन काही टॅक्सी चालकांनी आता सोशल मीडियावर आवाज उठवला असून आपल्याकडे असलेल्या अभियंते यांच्या माध्यमातून त्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे.तर ही बाब गंभीर असल्याने आणि पर्यटकांच्या तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्माण झालेला धोका लक्षात भिंत रस्त्यावर कोसळून कदाचित मोठा अपघात घडू शकतो ही बाब लक्षात घेऊन माथेरान नगरपालिका नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी एमएमआरडीए ला पत्र पाठवून तात्काळ लक्ष घालण्याची सूचना केली आहे.
सनी चंचे-माजी सदस्य नेरळ ग्रामपंचायत
आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना थोडी विश्रांती घेत असताना एका संरक्षण भिंती वर जाऊन बसलो.त्यावेळी ती भिंत माझ्यासह तेथे बसलेल्या काही मित्रांच्या बसण्याने बाजूला जात होती.त्यामुळे आम्ही घाबरून बाजूला झालो आणि पाहिले तर भिंत ही वरच्यावर बांधली आहे असे दिसले.
मिलिंद विरले-अध्यक्ष सहकार सेना,कर्जत तालुका
आम्ही अशा खराब कामांवर आवाज उठवीत आलो आहोत,आता आम्ही आमच्या काही अभियंता मित्रांना नेरळ माथेरान घाटातील कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले आहे.त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही एमएमआरडीए कडे अर्ज करणार असून त्या नित्कृष्ट कामाबद्दल आंदोलन केले जाईल.
प्रवीण पोलकम-अध्यक्ष टॅक्सी संघटना
आम्ही 24 तास पर्यटकांना सेवा देत असतो,त्यामुळे रात्री अपरात्री एखादी संरक्षण भिंत रस्त्यावर येऊन कोसळली आणि अपघात झाल्यास त्यावेळी मदतीला कोणी येणार नाही.आम्ही यापूर्वी देखील त्या कामाबाबत आवाज उठवला आहे,आता पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करू.
प्रेरणा सावंत-नगराध्यक्ष
माथेरान मध्ये पर्यटक येण्यासाठी टॅक्सी संघटना मोठा सहभाग घेत असते,त्यामुळे त्यांची तक्रार येताच आम्ही तात्काळ घाटरस्त्याचे काम पाहून एमएमआरडीए ला पत्र लिहीले आहे.त्यांनी त्याकडे लक्ष न दिल्यास आम्ही टॅक्सी संघटना आणि कर्जत अपडेट उभारणार असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ.
ढाणे-उपअभियंता, एमएमआरडीए
आमचे या रस्त्यावरील काम संपले असून काही तक्रारी असतील तर सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याबाबत सूचित करायला हवे.
अजयकुमार सर्वगोड-उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
घाटरस्त्याचे काम करताना एमएमआरडीए कडून देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी त्यांची आहे,त्यामुळे त्यांनी आमच्याकडे बोटे दाखवू नयेत.
फोटो ओळ
नेरळ माथेरान घाट रस्ता
छायः गणेश पवार