बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देणार*       *कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक*

*बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देणार*
      *कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक*


*• कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीसाठी समिती स्थापन करण्यात येणार*
*• अत्याधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश असणारे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न*
*• रोजगार निर्मितीवर भर*


पुणे,दि.७: राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी येत्या काळात तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून रोजगार मिळवून देण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले.


मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे वतीने आयोजित ' उच्च कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याबाबत' आज बैठक घेण्यात आली, या बैठकीत श्री. मलिक बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार शरद पवार, कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क अध्यक्ष दिलीप बंड, महासंचालक राजेंद्र जगदाळे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महासंचालक प्रशांत गिरबाने आदी मान्यवर उपस्थित होते.


श्री. मलिक म्हणाले, सध्याच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य विकासाला पर्याय नसून तरुणांनी हे प्रशिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे. कालबाहय अभ्यासक्रम बदलून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणा-या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश असणारे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अशा पध्दतीचे कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी सर्वप्रथम पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी मुलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगार मिळवून देण्यावर शासनाच्या वतीने भर दिला जाईल. उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे अत्याधुनिक पध्दतीचे कौशल्य शिक्षण मुलांना देवून अधिकाधिक रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने या विभागाचे वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात येईल. 
 खासदार शरद पवार म्हणाले, बदलत्या काळानुसार आणि विविध क्षेत्रांच्या मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे दिल्या जाणा-या विविध प्रशिक्षणाच्या पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. हा बदल घडवण्यासाठी कौशल्य विकास विभाग व उद्योजक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभाग सक्षम होणे गरजेचे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा  व तालुका स्तरावर विविध अभ्यासक्रमांची प्रशिक्षण केंद्र सुरु व्हायला हवीत. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्न आवश्यक असून कौशल्य प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी संबधित क्षेत्राचे प्राथमिक ज्ञान संपादन करुन त्या क्षेत्राचा दर्जा टिकवायला हवा.
बारामतीमध्ये असलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स या संस्थेत आशिया खंडातून 30 हून अधिक विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना विविध संस्थांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, असे सांगून ते म्हणाले, अशा पध्दतीचे अत्याधुनिक कौशल्य शिक्षण देणारी संस्था पुण्यात सुरु करण्याबाबत शासनाच्या वतीने विचार व्हायला हवा. 
आजच्या बैठकीत विविध नामवंत उद्योजकांशी व कौशल्य विकास क्षेत्रात काम करणा-या यशस्वी व्यक्तींचे विचारांची देवाण घेवाण झाल्यामुळे तरुणांना विविध कौशल्यांवर आधारित शिक्षण  व तत्सम सुविधा देवून नवीन पिढी तयार करण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास  खासदार श्री. पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने सुरु असणा-या विविध उपक्रमांची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.  तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्रदीप भार्गवा, उद्योजक मुकेश मल्होत्रा, प्रतापराव पवार, विक्रम साळुंखे, सतिश मगर, प्रमोद चौधरी, भरत आगरवाल, विनय ओसवाल, दिलीप बोराळकर, राजेश गुप्ते, दिपक करंदीकर, उमा गणेश, स्वाती मुजुमदार, आनंद खांडेकर यांनी सादरीकरणाद्वारे कौशल्य विकास क्षेत्रातील रोजगाराच्या संधी बाबत सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली. 
बैठकीला उद्योगपती, उद्योग क्षेत्रातील विविध कंपन्यांचे व्यवस्थापक तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.


00000