आम्ही लेकी सावित्रीच्या" कवयित्री संमेलनात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आम्ही लेकी सावित्रीच्या" कवयित्री संमेलनात महिलांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद

  पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
अध्यासन, पुणे मराठी ग्रंथालय आणि स्वयं महिला मंडळ यांच्या संयुक्त
विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त "आम्ही लेकी
सावित्रीच्या" कवयित्री संमेलन नुकतेच केशव सभागृह, पुणे मराठी ग्रंथालय
इथे पार पडले. डॉ. विजया रहाटकर (महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्ष) यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि अ. भा.
मराठी साहित्य मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य या प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. विजया रहाटकर यांनी
''स्त्रियांनी आता पुरुषांच्या बरोबरीने चालले पाहिजे. निराशेला झटकून
आशावादी असले पाहिजे," असे आवर्जून सांगितले. आपले मनोगत व्यक्त करताना
त्या म्हणाल्या, "माझी ओळख मी महिला आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे
परंतु मी औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदा कथालेखिका संमेलन आयोजित केले
होते. ती ओळखही आहे. कविता मला मनापासून आवडतात. कवितांनी भावविश्व व्यापून
गेले आहे. पण मायमराठीतल्या कविता नव्या पिढीला कुठे माहिती आहे? हे दु:ख
माझ्यातल्या आईला अस्वस्थ करते. नव्हे माझ्या मुलीला केशवसुत, ग्रेस
कुसुमाग्रज माहिती आहेत का? जर ते आणि त्यांच्या कविता नव्या पिढीला माहिती
नसेल तर हा मोठा प्रश्न आहे. या अशा नव्या पिढीला आपल्या सुंदर सकस कविता
ज्ञात व्हाव्यात म्हणून मी औरंगाबादमध्ये कवितांची बाग उभी केली. तिथे
आपल्या मराठी साहित्यातील कवींच्या दर्जेदार कविता मन प्रसन्न करतात. या
कवयित्री संमेलनातील निवडक कविता महिला आयोगाच्या 'साद' या प्रकाशित
होणार्‍या पुस्तकात घेऊ," असेही त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले.

डॉ. माधवी वैद्य यांनी स्त्रियांना माणूस म्हणून सन्मान मिळाला पाहिजे, ही
भावना व्यक्त केली. कविता कशी असावी आणि कविता लिहिल्यानंतर स्वतःच
तटस्थपणे तिचे परीक्षण करून तिचा दर्जा कसा वाढवावा, हा मौल्यवान मंत्र
त्यांनी दिला. यावेळी उपस्थित कवयित्रींनी काव्यवाचन केले. त्यात
कवयित्रींनी स्त्रीविषयक, सामाजिक, नातेसंबंध, सद्यस्थितीवरील कवितांचे
सादरीकरण केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे अध्यासन'चे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी प्रास्ताविक केले, 
डॉ. शामा घोणसे यांनी अतिथींची ओळख करून दिली, तर स्वयं महिला मंडळाच्या
अध्यक्षा योगिता साळवी यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाची धुरा
सांभाळली. पुणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यवाह अनुजा कुलकर्णीही
उपस्थित होत्या. पुणे, मुंबई,नगर, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी इ.जिल्ह्यातील
  ५५ कवयित्रींनी या संमेलनात आपल्या कविता सादर केल्या.संमेलनात मधुश्री
ओव्हाळ, सोनाली गाडे, प्रतिभा पवार,राखी रासकर, संगिता झिंजुरके, आफ्रिन
बागवान, डॉ.अनुश्री मेटकर, डॉ.रमा कवठेकर, अडव्होकेट अनिता देशमुख,रश्मी
थोरात,आरूषी दाते, सारिका ऐवळे, श्रुती दगडे,सीमा गांधी आदींनी कविता सादर
केल्या.