कोल्हापुरात कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा पहिला बळी, तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ________________________________

कोल्हापुरात कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा पहिला बळी, तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
________________________________


राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या रयत ऍग्रो संस्थेकडे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश्य आलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रमोद जमदाडे असे या तरुणाचे नाव असून तो पन्हाळा तालुक्यातील माले या गावचा रहिवासी आहे. प्रमोद जमदाडे याने रयत ऍग्रोच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता. मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनातगही तो सहभागी झाला होता. तसंच पन्हाळा तालुक्यातील गुंतवणूकदारांचे नेतृत्वही तो करत होता.
दरम्यान रयतमध्ये झालेल्या गुंतवणुकीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने रयतचा प्रमुख सागर सदाभाऊ खोत याची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी आज कोल्हापुरात जमदाडे यांच्या आत्महत्येनंतर अनेक गुंतवणूकदारांनी केली. त्यांच्याकडून या सर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत होता.
प्रमोद जमदाडे या २५ वर्षीय तरुणाने रयत ऍग्रोच्या कडकनाथ कोंबडी प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली होती. अल्पकाळात मोठा लाभ मिळणार अशी जाहिरात केल्याने तो भुलला होता. कुटुंबीयांकडून पैसे घेऊन त्याने प्रकल्पात गुंतवणूक केली होती. सुमारे पाच लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. पैसे बुडाल्याने त्याला वारंवार कुटुंबीयांचे टोमणे सहन करावे लागत होते. प्रकल्पात फसवणूक केली झाल्याने त्याने १८ तारखेला विषारी औषध प्राशन केले होते.
त्याला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच रयत मध्ये गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार तसेच नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. गुंतवणूकदारांनी रयत प्रमुख माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.