जळून मेलेले कांगारुचे पिलू आणि आपण कुठल्याही संवेदनशील माणसाचे मन विदीर्ण करणारे हे छायाचित्र आहे आँँस्ट्रेलियातले.

जळून मेलेले कांगारुचे पिलू आणि आपण


कुठल्याही संवेदनशील माणसाचे मन विदीर्ण करणारे हे छायाचित्र आहे आँँस्ट्रेलियातले.
अमेरिकेतील जंगले जळून खाक होत असतानाच आता आँँस्ट्रेलियातदेखिल जंगलांना आगी लागण्याचे की लावण्याचे दुष्ट सत्र सुरु झालेय.सुमारे ४८ कोटी प्राणी या
अग्निकांडात भस्म झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आॅस्ट्रिलिया देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या कांगारुंची
सर्वात जास्त हानी झाल्याचे स्पष्ट झालेय.
जंगलांमध्ये सुखेनैव विहार करणारे वन्यजीव पृथ्वीवरील
क्रूर-निष्ठुर माणसाच्या अधाशीपणामुळे हीन-दीन झाले असल्याचे हे चित्र प्रचंड वेदनादायी आहे.
                       
विकास आणि प्रगतीच्या नावाखाली माणूस शेखचिल्ली प्रमाणे स्वतः बसलेल्या झाडाच्या फांदीवरच कुर्‍हाड चालवतो आहे.जगातल्या जंगलांचा आणि जंगलीप्राण्यांचा याच वेगाने विनाश होत राहिल्यास वसुंधरेला कोणीही वाचवू शकणार नाही.पुढील मानवी पिढ्यांपुढे आपण काय काय वाढून ठेवलेय हेच यातून दिसत आहे.


विजेच्या तारेला चिकटून विद्युतभारामुळे क्षणार्धात कोळसा बनलेल्या या कांगारुच्या पिलाचे छायाचित्र जगभरात गाजते आहे.मनुष्य आपल्या स्वार्थासाठी
निसर्गाला संपवत सुटला आहे.जगातली विशाल अरण्ये
जळत असताना त्यात कोट्यवधी वन्यपशूंचा संहार सुरु
असताना जगभरातल्या सर्वसामान्य पर्यावरप्रेमी नागरीकांनी खंबीर होण्याचीही वेळ आता येऊन ठेपलीय.


आपापल्या राष्ट्रांमधील सरकारांना याबाबतचे ठोस धोरण
राबविण्याकरिता जागोजागी दबावगट तयार झाले पाहिजेत.शाळाकाॅलेजातून केवळ पुस्तकी धडे न देता प्रत्यक्ष कृतीकार्यक्रमांमधून पर्यावरणवादी विद्यार्थ्यांची पिढी बनवली गेली पाहिजे.त्यासाठी मुलांची मने संवेदनशील कशी होतील याची खबरदारी पालकवर्गाने
घ्यायला हवी आहे.


आपण राहतो त्या गाव-शहरापासून आपणांस सुरुवात करावी लागेल.झाडे आणि जंगले वाचविण्यासाठी सजग नागरिक आणि तरुण विद्यार्थ्यांची सक्रीय मंडळे,संघटना,संस्था उभ्या राहाव्यात.वनराई,वृक्षसंपदा वाढविण्यासाठी सरकारवर विसंबून न राहता जनरेट्यामधून परिसर हिरवागार होण्याच्या दिशेने पावले पडावीत.


जंगलांना लागलेल्या आगीमुळे आँँस्ट्रेलियासारख्या
प्रगत समजल्या जाणार्‍या देशातही आणीबाणीचा
प्रसंग उद्भवला आहे.पर्यावरण र्‍हासाविषयी आपण असेच बेफिकीर राहिलो तर तशी वेळ आपल्यावरही येण्यास वेळ लागणार नाही.जंगले वाचवणे त्यामधील वनसंपदा,वन्यजीव वाचवणे या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्यक्रम मिळाला तर आणि तरच पृथ्वीचा बचाव शक्य आहे अन्यथा या जळून गेलेल्या कांगारुच्या निरागस पिलाप्रमाणेच मानवजातही जळून राख होऊन जाईल.