*खांदेरी*
किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
सह्याद्रीतील भटक्या ट्रेकर्सला ऐकून सुपरिचित असलेली परंतु या सर्व ट्रेकर्सपैंकी अत्यंत कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलेली जलदुर्गांची जोडगळी म्हणजेच किल्ले खांदेरी - उंदेरी. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणार्या खांदेरी - उंदेरीचे वैशिष्टय म्हणजे मजबूत तटबंदी, उंदेरीवर असणार्या १५-१६ तोफा, तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ अशा तोफांना वाहून नेणार्या गाड्यासहीत असणार्या ३ तोफा होय.
इतिहास :
मुंबईच्या इंग्रजांवर वचक बसविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईपासून १५ मैलावर असणार्या 'खांदेरी' बेटावर किल्ला बांधण्याचे इ.स.१६७२ मध्ये ठरविले. त्याप्रमाणे किल्ल्याची तटबंदी बांधण्यास सुरुवात झाल्यावर इंग्रज व सिद्दी अस्वस्थ झाले. त्यांनी किल्ल्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवरायांनी तात्पुरती माघार घेतली व किल्ला बांधण्याचे काम थांबविले. इ.स १६७९ मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली निवडक १५० माणसे देऊन ऐन पावसाळयात खांदेरी दूर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. यामुळे अस्वस्थ झालेल्या इंग्रजांनी किल्ल्याचे बांधकाम थांबविण्याचा प्रयत्न केला, पण किल्ल्यावरुन मायनाक भंडारी व किनार्यावरुन (थळच्या खुबलढा किल्ल्यावरुन) दौलतखान यांनी इंग्रजांना प्रतिकार करुन किल्ल्याला रसद पुरवठा चालू ठेवला. या कामी महाराजांच्या आरमारात असलेल्या उथळ तळाच्या छोटया होडयांनी महत्वाची भूमिका निभावली. ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून या बोटींच्या हालचाली चालू असताना इंग्रजांच्या खोल तळ असलेल्या बोटी समुद्रात खोल पाण्यात अडकून पडल्यामुळे इंग्रजांना हात चोळत बसावे लागले. शेवटी इंग्रजांनी १६८० मध्ये शिवाजी महाराजांशी तह केला.
पुढे ८ मार्च, १७०१ रोजी सिद्दी याकूत खानने 'खांदेरी' वर हल्ला केला, पण मराठयांनी तो परतावून लावला. १७१८ मध्ये इंग्रजांनी मोठा तोफखाना युध्द नौकांवर ठेवून किल्ल्यावर हल्ला केला, पण किल्लेदार माणकोजी सूर्यवंशी याने किल्ला ५०० माणसांनीशी महिनाभर लढवला. त्यामुळे इंग्रजांना हात हलवित परत जावे लागले. पुढे १८१४ मध्ये खांदेरी पेशव्यांच्या ताब्यात गेला. १८१७ मध्ये त्याचा ताबा परत आंग्रेकडे गेला. १८१८ मध्ये 'खांदेरी' किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पहाण्याची ठिकाणे :
खांदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतांनाच खांदेरीची मजबूत तटबंदी ,बुलंद बुरुज आणि त्यावर असणारे 'मुंबई पोर्ट ट्रस्ट' चे दिपगृह आपले लक्ष वेधून घेते. खांदेरीवर दक्षिणेला ३० मीटर उंचीची, तर उत्तरेला २० मीटर उंचीची टेकडी आहे. या दोन टेकडयांमध्ये बोटींसाठी धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर ज्या ठिकाणी समुदाच्या पाण्याचा स्पर्श होतो तेथे चक्क एक तोफ पुरलेली आहे. या तोफेचा मागचा भाग पाण्यातून डोकावतांना दिसतो. बाजूलाच बोटीची एक शेड बांधली आहे.
१ वेताळाचे मंदिर :-
धक्क्याच्या बाजूलाच उजवीकडे वेताळाचे लाकडी मंदिर आहे. आत एक मोठी पाढर्या रंगाने रंगविलेली शिळा आहे. ही शिळा म्हणजेच वेताळ होय. ही शिळा दरवर्षी आकाराने मोठी होत जाते, अशी गावकर्यांची श्रध्दा आहे. होळीच्या दिवशी येथे जत्रा भरते.
२ भांड्याचा आवाज येणारा खडक :-
डावीकडे असणार्या धक्क्यावरून उतरून आपण दिपगृहाकडे निघालो की आपण बाजुलाच झाडांध्ये हा मध्यम आकाराच खडक दिसतोछोट्या दगडांनी यावर ठोकून पाहिले असता अक्षरक्ष: भांड्यावर ठोकल्या सारखा आवाज येतो
३ गाड्यावरील असणार्या तोफा :-
धक्क्यावरून दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच असणारे एक तळे आहे. ते मागे टाकून दिपगृहाच्या बाजूने पुढे जातांना बुरुजावर जाण्यासाठी पायर्या केलेल्या आहेत. वर पोहोचल्यावर आपल्याला दिसते ती गाडयांवर ठेवलेली तोफ. ही तोफ आकाराने मध्यम असून ती आजही सुस्थित आहे. अशाच दोन तोफा बाजूला असणार्या लहान टेकडीच्या बुरुजावर आहेत.
४ दिपगृह :-
१८६७ मध्ये बांधण्यात आलेले दिपगृह २५ मी उंचीचे असून षट्कोनी आकाराचे आहे. दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची आहे. दिपगृहाच्या शिखरावरून किल्ल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो.
५ मजबूत तटबंदी :-
दिपगृहाच्या बाजूला तटबंदीवर जिथे हेलिपॅड आहे, तिथेच खाली एक दरवाजा आहे. हा दरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो. येथून बाहेर पडल्यावर कडेकडेने चालतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांची कल्पना येते. याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे एक जुने मंदिर असून गणपती व मारुती ची अलिकडे बांधलेली मंदिरे पण आहेत. किल्ल्यावर पाण्याचे टाकेसुध्दा आहे. वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीध्ये एक द्वार आहे. तिथेच एक छोटी खोली आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) थळ मार्गे :-
खांदेरी - उंदेरी या जलदुर्गांवर जाण्यासाठी आपल्याला अलिबागला जावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ किमी अंतरावर "थळ" नावाच्या गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून २ ते ३ किमी वर "थळ" गाव आहे. अलिबागहून येथपर्यंत येण्यासाठी एसटी बस उपलब्ध आहेत. थळ बाजारपेठे जवळून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात. अलिबागहून थळ आगाराकडे जाणार्या एसटी ने ही आपण बाजारपेठेकडे जाणार्या फाट्यावर उतरून चालत येथ पर्यंत येऊ शकतो.थळ बाजारपेठे जवळच्या समुद्रकिनार्याहून दिसणारी दोन बेटे आपले लक्ष सहज वेधून घेतात. यापैंकी जवळ असणारा किल्ला म्हणजे उंदेरी व डाव्याबाजूला थोड्या लांब असणारा किल्ला म्हणजे खांदेरी होय. खांदेरी किल्ला त्यावर असणार्या दिपगृहामुळे लगेच लक्षात येतो. थळ बाजारपेठेच्या ठिकाणी सकाळी लवकर येणे सोईस्कर अन्यथा किनार्यावरील बोटी मासेमारी करण्यासाठी सकाळी ६ , ६.३० च्या आत समुद्रात जायला निघतात. उशीरा पोहोचल्यास मासेमारी करून येणाया बोटी आपल्याला मिळू शकतात.
मध्यम आकाराच्या साधारणत: ५ ते ६ लोक बसू शकतील अशा होड्या खांदेरी - उंदेरी दाखवून परत आणण्याचे होडीवाले भाव सांगतांना मात्र दुप्पट सांगतात. खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे, ती सोय उंदेरीवर नाही. त्यामुळे उंदेरीवर ओहटीच्या वेळेसच जाता येते.खांदेरवर कधीही गेले तरी चालते, मात्र उंदरीवर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. भरती ओहटीची वेळ काढण्याची सोपी पध्दत म्हणजे आपण ज्या दिवशी किल्ला पाहण्यास जाऊ त्यादिवशी मराठी पंचागा प्रमाणे जी तिथी असेल, तिला ३/४ ने गुणल्यास पूर्ण भरतीची वेळ सांगणारा आकडा मिळतो. उदा. जर चतुर्थी असेल तर ४ ला ३/४ ने गुणल्यास ३ आकडा मिळतो. म्हणजेच ३ वाजता रात्री किंवा दुपारी पूर्ण भरती असेल. याचप्रमाणे पूर्ण भरतीच्या वेळेनंतर ठीक ६ तासांनी पूर्ण ओहटीची वेळ असते. तर वरील उदाहरणामध्ये ९ वाजता रात्री आणि सकाळी ओहटी असते. थळच्या समुद्रकिनार्याहून उंदेरी किल्ला समुद्रात साधारण अडीच किमी वर आहे, तर खांदेरी किल्ला किनार्यापासून तीन साडेतीन किमी वर आहे. उंदेरीहून पश्चिमेला पाऊण किमी वर खांदेरी आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
खांदेरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे. उंदेरीवर पाणी अजिबात नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
अलिबाग मार्गे २ तास लागतात.
सूचना :
१) खांदेरी, उंदेरी व खुबलढा किल्ल्याचे अवशेष एका दिवसात पाहाता येतात.
२) खुबलढा, उंदेरीची माहिती साईटवर दिलेली आहे. तसेच भरती ओहटीचे वेळापत्रक साईटवरील कुलाबा किल्ला व सर्जेकोट किल्ल्याच्या माहितीमध्ये दिलेले आहे.
या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे