अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त  डॉ. पी. ए. इनामदार  यांचा सत्कार*

 


 *अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त  डॉ. पी. ए. इनामदार  यांचा सत्कार*
.......................................
यशामध्ये ईश्वराची कृपा,
गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम आणि वडिलांनी दिलेला मूलमंत्र, या  गोष्टींचा सिंहाचा वाटा :डॉ. पी. ए. इनामदार 
.............................
*छ. शाहू महाराजांच्या विचारांनुसार डॉ. इनामदार यांचे मार्गक्रमण : डॉ. रत्नाकर गायकवाड*


पुणे: 


"विजापूरहून केवळ १५ रुपये घेऊन
पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करीत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे कार्य वाढवले . या संस्थेच्या आज ३१ शाळा,महाविद्यालये आहेत,28 हजार विद्यार्थी शिकत आहेत, या यशामध्ये ईश्वराची कृपा,गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम आणि वडिलांनी दिलेला मूलमंत्र, या चार गोष्टींचा सिंहाचा वाटा आहे," अशी भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी शनिवारी सायंकाळी व्यक्त केली.


अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त डॉ. पी. ए. इनामदार यांचा सत्कार राज्याचे माजी मुख्य सचिव  डॉ .रत्नाकर गायकवाड, डॉ कुमार सप्तर्षी,डॉ. विश्वनाथ कराड अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते  आला. डॉ पी ए इनामदार यांच्यावरील गौरवांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच स्कूल ऑफ आर्ट च्या महेश निरंतरे यांनी रंगवलेले डॉ.पी. ए. इनामदार यांचे तैलचित्र संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले.


 हा कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आझम कॅम्पस मैदानावर झाला.



राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. रत्नाकर गायकवाड, डॉ कुमार सप्तर्षी,डॉ विश्वनाथ कराड,डॉ.सुहास परचुरे, राजीव जगताप, डॉ. एस. एन. पठाण, अमृतमहोत्सव
समितीचे अध्यक्ष लतीफ मगदूम ,
डॉ. इनामदार यांच्या पत्नी आबेदा इनामदार, संजय नहार,डॉ. सुधाकर जाधवर आदी व्यासपाठीवर उपस्थित होते.


डॉ. इनामदार म्हणाले, “महात्मा
जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी
शाहू महाराज आदींनी शिक्षणाची
मुहूर्तमेढ रोवली. यातून प्रेरणा घेऊन
मी शिक्षण संस्था वाढवली. संस्था
अल्पसंख्याकांसाठी असली, तरी येथे
जात-पात, धर्म मानला जात नाही. सर्व
गरीब आणि गरजूंना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, हे या संस्थेचे ध्येय आहे. 


ते पुढे म्हणाले,'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली आहे. यातील
तरतुदीनुसार भारत हे धर्मनिरपेक्ष
राष्ट्र आहे. शिवाय, महाराष्ट्र राज्य
हे पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे
देशात अनेक धर्म असले, तरी
सर्वांचा ईश्वर एकच आहे'.


'पत्नी, मित्र परिवार,
संस्थेचे पदाधिकारी, संस्थेतील
शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पुणेकर
नागरिक आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी
दिलेला पाठिंबा आणि साथ माझ्या
यशामध्ये तेवढीच मोलाची आहे,
त्यामुळे मी या सर्वांचा सदैव ऋणी
राहीन', असेही ते म्हणाले.


*छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते सन्मान*
नियोजित कार्यक्रमानुसार डॉ. इनामदार यांचा सत्कार कोल्हापूरचे छत्रपती
शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार होता; परंतु शाहू महाराज यांनी
या कार्यक्रमा पूर्वीच दुपारी आझम कॅम्पसमध्ये येऊन त्यांचा सत्कार केला.
त्याची चित्रफीत या कार्यक्रमात दाखविण्यात आली. 


यावेळी बोलताना डॉ. रत्नाकर गायकवाड म्हणाले, ' इनामदार यांनी सचोटीने केलेले कार्य अद्‌भूत आहे.छ. शाहू महाराजांच्या विचारांनुसार डॉ. इनामदार यांचे मार्गक्रमण सुरू आहे. '


डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, '  सर्व जाती -धर्माना पुढे घेऊन जाण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे डॉ.पी.ए. इनामदार यांना मोठे यश मिळाले. भारत विश्व गुरु होण्यासाठी अशा प्रयत्नांचे योगदान महत्वाचे ठरत आहे. '


डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ' मुस्लीम समाजात शिक्षण रुजविण्याचे महत्वपूर्ण काम डॉ. इनामदार यांनी केले. सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणींचा त्यांनी अचाट धैर्याने सामना केला.  समाजसेवक किती धाडसी आणि अचाट शक्तीचा असला पाहिजे, हे डॉ.पी. ए. इनामदार यांच्याकडे पाहून कळते. '


इक्बाल अन्सारी, डॉ. ऋषी आचार्य यांनी  सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरवात साहिर लुधियानवी यांच्या ' न हिंदू है, तू मुसलमान है तू, इन्सान की औलाद है, तू इन्सान बनेगा '  गीताने झाली.


................................................