दातृत्व, त्याग भावनेतूनच समाजाचा उत्कर्ष* - श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन; 'टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियम'तर्फे पुरस्कारांचे वितरण

 


*दातृत्व, त्याग भावनेतूनच समाजाचा उत्कर्ष*


- श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन; 'टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियम'तर्फे पुरस्कारांचे वितरण


पुणे : "आपल्यातील संवेदनशील वृत्ती जागी ठेवून समाजातील वंचित, गरजू घटकांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गोष्टी पुरविण्यासाठी योगदान द्यायला हवे. इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आपल्या आयुष्यातील काही भाग समाजासाठी दिला पाहिजे. त्यासाठी आपल्यातील दातृत्व, त्याग भावना जोपासायला हवी. त्यातूनच समाजाचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष होईल," असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.


टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियमतर्फे (टीएमसी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना नगर रस्त्यावरील हॉटेल नोवाटेल येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर 'टीएमसी'चे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा, सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सचिव डॉ. जयसिंग पाटील, 'टीएमसी'चे उपाध्यक्ष मुकेश मल्होत्रा, अश्विनी मल्होत्रा, सिमरन जेठवानी, जेनीस सोमाजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, 'डीआयएटी'चे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायण, रोटरी क्लबचे प्रांतपाल रवी धोत्रे, 'एलआयसी'चे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक बरूणकुमार खान, 'एमआयटी'चे कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, ब्रह्माकुमारी संस्थेचे माजी सचिव डॉ. बी. के. मृत्यंजय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार, गिरीप्रेमींचे उमेश झिरपे, सुदर्शन जीन्सचे व्यवस्थापकीय संचालक गौतम बन्सल, नीलकंठ ज्वेलर्सचे सुरेंद्र पॉल सिंग आदींना विशेष सन्मानित करण्यात आले.


श्रीनिवास पाटील म्हणाले, "समाजातील उपाशीपोटी झोपनाऱ्या लोकांच्या पोटात अन्नाचे दोन घास जावेत, यासाठी खिचडी वाटपाचा सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे. इस्कॉनच्या मदतीने टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शियमने रोज पाच हजार खिचडी पॅकेटचे वाटप होतेय. यातून बाहरी मल्होत्रा यांच्या भावनिक मनाचे दर्शन होते. दोन्ही हाताने देण्याची वृत्ती आपणही जोपासली पाहिजे. आज सन्मानित झालेले हे सगळे लोक पाझरत्या मनाचे आणि समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे आहेत. त्यांच्यातील दातृत्व, त्यागभाव बघून मलाही आनंद झाला आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा कर्तबगार व्यक्तींना सन्मानित केल्याने इतरांसमोर आदर्श निर्माण होतो. अशा यशवंताकडून प्रेरणा घेऊन जिद्दीने काम करण्याची स्फूर्ती मिळते. समाजातील वंचित घटकांकडे आपण सर्वानी लक्ष दिले पाहिजे. त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. "


स्वागतपर भाषणात बाहरी बी. आर. मल्होत्रा म्हणाले, "समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तन-मन-धन झोकून देत ही सेवा केली पाहिजे. २०१६ पासून इस्कॉनच्या मदतीने गरजुंना रोज ५००० खिचडीचे पॅकेट्स दिले जात आहेत. या उपक्रमात अनेकांचा सहभाग प्रोत्साहन देणारा आहे."


डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या या व्यक्तींचा सन्मान आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देत असल्याचे नमूद केले. डॉ. नितीन करमाळकर, डॉ. बी. के. मृत्युंजय, डॉ. राजीव ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. जयसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.