मराठी गझल क्षेत्रातील स्वतंत्र प्रज्ञेचे व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब पाटणकर

मराठी गझल क्षेत्रातील स्वतंत्र प्रज्ञेचे व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब पाटणकर
-  ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील
पुणेः- मराठी आणि उर्दूतील प्रमुख शायर म्हणून भाऊसाहेब पाटणकर यांचे नाव घेतले जाते. मराठी गझल क्षेत्रातील स्वतंत्र प्रज्ञेचे व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब पाटणकर होय, असे मत ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांनी व्यक्त केले. 


रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध कवी गीतकार गायक संदीप खरे यांना ज्येष्ठ निवेदक लेखक पुण्यभूषण सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून संजीवनी बोकील बोलत होत्या.


यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, श्यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना  संजीवनी बोकील म्हणाल्या की, भाऊसाहेबांनी आपल्या मराठीशायरीला उर्दूचा कोणताही स्पर्श होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेतली. माझ्या मराठी शायरीला उर्दू शायरीचा अनुवाद तर दूरच पण त्याचा वास देखील येऊ नये,  असा माझा प्रयत्न असतो, असे ते नेहमी सांगत असत. हैद्राबाद पासून दिल्ली पर्यंतच्या उर्दू शायरी  क्षेत्रातील सर्व प्रस्थापितांच्या शायरांशी झुंज देत त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. अस्सलता काय असते ते भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीतून कळते.


यावेळी बोलताना सुधीर गाडगीळ म्हणाले की, मी कवी नाही आणि कवितेचा अभ्यासदेखील नाही पण मी कवितेचा आस्वादक निश्चित आहे. भाऊसाहेबांनी मराठीशायरीच्या मुलखात केवळ आपले अस्तित्व निर्माण केले नाही, तर त्यांनी या क्षेत्रात आपले अधिराज्य गाजवले. मराठी शायरी हा साहित्यप्रकार मराठी कवींना उपलब्ध करून देत त्यांनी साहित्याचे नवे दालन खुले करून दिले. तसेच शायरी या साहित्यप्रकाराविषयी ओढ निर्माण केली. त्यांची प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती.  भाऊ साहेबांना दिसत नसले तरी त्यावेळी त्यांनी केवळ माझ्या प्रश्नांची उत्तरे दिले नाही तर अगदी सहजपणे माझ्या मनाचा ठाव घेतला. माझ्याशी तरलपणे संवाद साधला आणि इथूनच  भाऊसाहेबांशी माझे सूर जुळले. सृजनशील आव्हानांना सामोरे जाणे, हा त्यांच्या स्वभावाचा मोठा गुण होता. तसाच स्वभावगुण असलेले कवी संदीप खरे यांना आज हा भाऊसाहेबांच्या नावाचा पुरस्कार जात आहे, हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे.  भाऊसाहेबांची शायरी म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी अशी होती. 


यावेळी बोलताना संदीप खरे म्हणाले की, गझल हा एक तरल काव्य प्रकार आहे. या क्षेत्रात भाऊसाहेबांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. श्यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला यांनी आभार मानले. 


छायाचित्र ओळीः-  रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध कवी गीतकार गायक संदीप खरे यांना प्रदान करताना ज्येष्ठ निवेदक, लेखक, पुण्यभूषण सुधीर गाडगीळ. यावेळी (डावीकडून) संजीवनी बोकील, अॅड. प्रमोद आडकर, खरे, गाडगीळ आणि भारत देसडला.