त्येक भूभागाचा सांस्कृतिक दस्तावेज लिहिला जावा – सबनीस

त्येक भूभागाचा सांस्कृतिक दस्तावेज लिहिला जावा – सबनीस
पुणे, ता. २८ – सांस्कृतिक दस्तावेज ही इतिहासातील महत्त्वाची संकल्पना आहे. प्रत्येक भूभागाला इतिहास असतो आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणचा इतिहास लिहिला जायला हवा, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी केले.


पद्मगंधा प्रकाशन आणि आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह, शेवगाव यांच्या वतीने अॅड. शिवाजीराव काकडेलिखित 'आबासाहेब आणि मी' या ग्रंथाचे प्रकाशन माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शिरीष लांडगे व प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव शिंदे हे यावेळी प्रमुख पाहुणे होते.  


'आबासाहेब आणि मी' या ग्रंथाचे सविस्तर रसग्रहण करताना डॉ. सबनीस म्हणाले, की "सामाजिक चळवळीचा आणि शेवगावचा इतिहास मांडणाऱ्या पुस्तकाचे स्वरूप या पुस्तकाला लाभले आहे. सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक इतिहासाचे अंतःप्रवाह शेवगावच्या परिसराशी व काकडे कुटुंबियांशी कसे जुळलेले आहेत, हे या पुस्तकात येते. चरित्र, आत्मचरित्र व इतिहास या तिन्ही वाङ्मयाचे एकत्रित अभिव्यक्तीकरण मराठीत फार कमी आहे, मात्र या पुस्तकात ते झाले आहे. एक प्रकारे हे नगर जिल्ह्याचे चरित्र आहे.एखादा भूभाग हा कितीही छोटा असो, मात्र त्याला स्वतःचा इतिहास असतो आणि प्रत्येक ठिकाणचा इतिहास लिहिला जायला हवा.


स्व. आबासाहेब काकडे यांच्याबाबत ते म्हणाले, की आबासाहेब शेवटपर्यंत डाव्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. विरोधक हा शत्रू नसतो हे लोकशाहीचे सूत्र आबासाहेबांनी पाळले.  


यावेळी उल्हास पवार म्हणाले, "आईबद्दल अनेकांनी लिहिले आहे परंतु वडिलांबद्दल फारसे कोणी लिहिले नाही. हे पुस्तक म्हणजे पितृभक्त माणसाने आपल्या वडिलांच्या कर्तृत्वाबद्दल मनापासून लिहिलेली शब्दांची आदरांजली आहे. मतभेदांना मनभेदांची किनार सध्याच्या काळात लाभली आहे. त्यातून कटुता निर्माण होतो आणि लोकशाहीला हे मारक आहे. सध्याचे राजकारण हे तडजोडीचे राजकारण असून येत्या काळात त्याची परिसीमा होईल, असे मला वाटते. मात्र आबासाहेबांनी मतभेदांचा कधीही संबंधात अडसर येऊ दिला नाही. त्यांनी नेहमी समाजाचे नशीब शोधण्याचे काम केले. तसेच खऱ्या अर्थाने उदारमतवाद त्यांच्या चरित्रात दिसतो."


लेखक अॅड. काकडे म्हणाले, "गेल्या १० ते १५ वर्षांपासून आबासाहेबांवर पुस्तक लिहिण्याचा मनात विचार होता. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही ही गोष्ट त्यांना कळून चुकली होती. म्हणूनच त्यांनी १८ वसतीगृहे सुरू केली. नगर जिल्ह्यातील पूर्व भागात विजेचे जाळे व्हावे म्हणून त्यांनी संघर्ष केला. स्वतःच्या कुटुंबापासून सुरूवात करून त्यांनी महिलांचे संघटन केले. आबासाहेबांची अशी विविध रूपे मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. आबासाहेबांचे कार्य एवढे मोठे होते, की त्यावर न लिहिणे ही त्यांच्या कार्याशी प्रतारणा ठरली असती. आबासाहेबांचा वारसा चालवत असताना त्यांच्या सहवासात आलेली माणसे भेटत गेली व त्यांचा मोठेपणा अधिकाधिक कळत गेला. अनेकांना माहीत नसलेल्या बाबी मी पुस्तकात सांगितल्या आहेत."


 


प्रास्ताविक करताना डॉ. शिंदे म्हणाले, "स्वातंत्र्यपूर्व काळात स्व. आबासाहेबांनी ग्रामीण भागात शिक्षणाची धुरा वाहिली. शिवाजीराव काकडे तीच परंपरा समर्थपणे चालवत आहेत. आबासाहेबांच्या कार्याची स्मृती कायम राहावी यासाठी हे पुस्तक त्यांनी लिहिले. चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे."


डॉ. लांडगे पाटील म्हणाले, "वडील व मुलगा असा वेगळा अनुबंध काकडे यांनी मांडला आहे. नगर जिल्ह्याचे एक सांस्कृतिक वैभव या पुस्तकाच्या निमित्ताने समोर येत आहे."


माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकाशक जाखडे यांनी आभार प्रदर्शन केले.