कृपया प्रसिध्दीसाठी दि. १४ डिसेंबर २०१९
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे
अभिरूप संसद -२०१९ एमआयटी डब्ल्यूपीयूत संपन्न
ओडिशा विधानसभेचे सभापती डॉ. सुजो नारायण पात्रे बनले संसदेचे सभापती
पुणे, १४ डिसेंबर: देशाचा घटता जी.डी.पी., जम्मू काश्मिरमधील कलम ३७०, अयोध्या येथील राम मंदिर, महिलांवर वाढत जाणार्या अत्याचारांच्या घटना, रोजगार, शिक्षण क्षेत्रातील त्रुटी, आणि ऑनलाईन बँकिंग घोटाळे यासारख्या महत्वपूर्ण मुद्यांवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) च्या अभ्यासक्रमा अंतर्गत आयोजित अभिरूप संसद सत्र-२०१९ मध्ये खडाजंगी झाली.
सुरवातीला समय सोनी व सुमित गुप्ता या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. शीला दीक्षित, अरूण जेटली, सुषमा स्वराज, राम जेठमलानी आणि टी.एन.शेषन यांना श्रध्दांजली वाहिण्यात आली.
अभिरूप संसद सत्र -२०१९ चे सभापती ओडिशा विधानसभेचे सभापती डॉ. सुजो नारायण पात्रो हे होते. तसेच, सय्यद झकेरिया सुल्तान (पंतप्रधान), सुयोग सांगळे (गृह मंत्री), निधी केजरीवाल (मनुष्यबळ विकास मंत्री), निमेश लखेवार (गृह राज्य मंत्री), सुभम पद्मारस (अर्थ मंत्री), जमेला चौधरी (महिला आणि बालकल्याण मंत्री) व अक्षय पाटणकर (कायदा मंत्री) यांच्याबरोबरच कित्येक विद्यार्थ्यांनी सत्ताधारी पक्षाचे खासदार बनून देशाच्या महत्वपूर्ण मुद्यांवर आपली बाजू मांडली. तसेच, विरोधी पक्षाकडून विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. विरोधी पक्षनेता एम.मुथ्थारसन याच्याबरोबरच कित्येक विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षीय खासदार बनून सत्ताधार्यांना देशातील प्रमुख समस्यांवर कोंडीत पकडले.
जम्मू काश्मीर येथील समस्यांवर विरोधकांनी प्रकाश टाकल्यावर परराष्ट्र मंत्री गोपेश चौधरिया यांनी उत्तर दिले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्यामुळे तेथील जनतेच्या रक्षणाची जवाबदारी ही आमची आहे. कलम ३७० लागू केल्यानंतर येथील परिस्थितीत हळू हळू सुधारणा होतांना दिसत आहे. शत्रूकडून होणार्या हल्याला प्रती उत्तर देण्यासाठी येथील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील वातावरण हे सामान्य स्थितीत आलेले आहे.
पंतप्रधानांनी हे सरकार देशातील सर्वसाधारण व्यक्तींसाठी काम करीत आहे. त्यांचे सामाजिक प्रश्न, डिजिटीलाइजेशन, आधुनिकीकरण, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, कृषीक्षेत्रातील प्रगती इ. महत्वपूर्ण प्रश्नांवर त्यांनी विचार मांडले.
विरोधी पक्षाने जीडीपी व वाढत्या बेरोजगारीची समस्या उपस्थित केली. तसेच, देशातील ३ हजार पेक्षा अधिक उत्पादन कंपन्या बंद पाडल्या आहेत, असे म्हंटले.
त्यावर सरकारी बाजू मांडतांना मंत्री म्हणाले, भारत विकासाच्या दिशेने जोरदार वाटचाल करीत आहे. जीडीपी थोडे खाली आले. परंतू हे कायम टिकणार नाही. प्रधानमंत्री कृषी योजना, प्रधानमंत्री कौशल्य योजना, स्टार्टअप योजना सुरू केल्यामुळे काही दिवसांमध्ये भारत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल. तसेच देशाचा जी.डी.पी. हा ७.१ टक्यांपर्यत पोहचेल.
यानंतर देशांंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व जीएसटी विषयावरून सदनामध्ये खडाजंगी झाली. विरोधकांनी ऑनलाईन बॅकिंग घोटाळे या विषयाकडे लक्ष वेधले.
सत्ताधारी पक्षातील महिला आणि बालकल्याण मंत्री जमेला चौधरी यांनी महिला सुरक्षा विधेयक पास करण्यासबंधात विचार मांडला. त्या म्हणाल्या की, देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सबलीकरण करणे गरजेचे आहे. लोकांची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत पोलिसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
त्यावर ओडिशाचे सभापती डॉ. सुजो नारायण पात्रो म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.
अभिरूप संसद-२०१९ संदर्भात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, देशाचे संसद सत्र कसे चालते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून या सत्राचे आयोजन केले आहे. येथे विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष आप-आपले डावपेच कसे लढवितात, आपले मुद्दे कसे मांडतात, विरोधी पक्षांप्रमाणे मंत्री कशा पद्धतीने प्रभावशाली उत्तरे देतात, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थींना मिळतो. याचा उपयोग या विद्यर्थ्यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत निश्चितपणे होईल.
उपसभापती म्हणून प्रा. परिमल सुधाकर यांनी काम पाहिले.
याप्रसंगी मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास या उपस्थित होत्या.