स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पहायला मिळणार ‘चवदार तळे सत्याग्रह’

इतिहास जिवंत होणार…


स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पहायला मिळणार 'चवदार तळे सत्याग्रह'


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे महाडचा सत्याग्रह. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता तर ती सुरुवात होती मानवी मुलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहू लागले. अंगावर रोमांच उभा करणारा हा ऐतिहासिक प्रसंग स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार आहे. खास बात म्हणजे ६ डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशीच या खास भागाचं शूटिंग करण्यात आलं.


या विशेष भागाच्या शूटिंगविषयी सांगताना बाबासाहेबांची भूमिका साकारणारे सागर देशमुख म्हणाले, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनी आम्ही महाड सत्याग्रहाचे चित्रीकरण केले. हा एक विलक्षण योगायोग आहे. महामानवाला ह्यापेक्षा अधिक चांगली श्रद्धांजली असू शकत नाही. त्यांच्या महान कार्याची आठवण होऊन, त्यांनी केलेला बदल ऐकून, वाचून डोळ्यात पाणी येतं आणि त्यांच्यासारख्या महामानवा पुढे नतमस्तक व्हायला होतं. माझ्या करीयरच्या या टप्प्यावर मला त्यांची भूमिका साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि हेही मान्य करतो की ती साकारणं खूप जास्त अवघड काम आहे. त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी मला माणूस म्हणून चकित करून जाते. आत्तापर्यंत आपण बाबासाहेब घरी कसे होते आणि त्यांची शिक्षणाची तळमळ काय होती हे बघितले. आता आपण मुख्य ऐतिहासिक घडामोडींकडे वळणार आहोत. आता बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यासाठी न चुकता पाहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.