कर्जत पंचायत समिती च्या सभापती पदासाठी शिवसेनेत चुरस 30 डिसेंबर ला निवडणूक
कर्जत पंचायत समिती च्या सभापती पदासाठी शिवसेनेत चुरस

30 डिसेंबर ला निवडणूक

कर्जत,दि .25  गणेश पवार

                               कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी येत्या 30 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी कर्जत पंचायत समिती मधील सत्ताधारी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत.दरम्यान,कर्जत पंचायत समितीत बहुमत असलेला शिवसेना पक्ष राज्यातील सत्ताधारी घटक पक्ष यांना एकत्र घेणार का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

                          कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी 30 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.सर्वसाधारण असलेल्या कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सर्वांना सभापती होण्याची संधी असल्याने अनेकांच्या इच्छा आकांक्षा यांना भरते आले आहे.कर्जत पंचायत समितीमध्ये 12 सदस्य यात शिवसेना-7, राष्ट्रवादी-3,शेकाप-2असे 12 सदस्य असून शिवसेनेचे पूर्ण बहुमत कर्जत पंचायत समिती मध्ये पहिल्यांदा आले आहे.मावळते सभापती पद हे देखील सर्वसाधारण असल्याने शिवसेनेकडून तीन सदस्यांनी सभापती पदावर काम केले.पहिल्या टप्प्यात अमर मिसाळ यांना तर नंतर प्रदीप ठाकरे यांनी आणि आता राहुल विशे हे सभापती आहेत.त्यावेळी उपसभापती म्हणून सुषमा ठाकरे यांना तर आता काशीनाथ मिरकुटे यांच्याकडे उपसभापती पद आहे.शिवसेनेच्या सात सदस्यांमध्ये छाया पवार आणि सुजाता मनवे यांना कोणत्याही अद्याप पदाधिकारी होता आले नाही.मात्र यावेळी सर्वसाधारण महिला किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी सभापती पद राखीव राहील असे बोलले जात होते. परंतु पुन्हा एकदा सर्वसाधारण गटासाठी सभापतीपद राखीव झाल्याने कर्जत पंचायत समिती मधील सर्व 12 सदस्य यांना सभापती होण्याची संधी आहे.

                              परंतु पक्ष संघटना मजुबत करण्याचा प्रयत्न करणारा आणि विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या मर्जीमधील सदस्याला सभापती पदाची उमेदवारी दिली जाऊ शकते.मात्र वरील सर्व निकष लक्षात घेता शिवसेनेत दोन नावे आघाडीवर आहेत.त्यात अमर मिसाळ आणि प्रदीप ठाकरे यांच्याकडे सभापतीपद जाण्याची शक्यता अधिक आहे.कारण पहिल्या टप्प्यात ज्यावेळी सभापती पद सर्वसाधारण झाले होते,त्यावेळी देखील बहुमत असलेल्या शिवसेनेत अशीच स्थिती निर्माण झाली होती.परंतु कर्जत शिवसेनेवर वर्चस्व असलेले महेंड थोरवे यांनी अमर मिसाळ यांना सभापतीपद दिले होते.त्यामुळे यावेळी काही वेगळे घडेल असे वाटत नसून नेरळ गणातून निवडून आलेल्या सुजाता मनवे यांच्या कडे अडीच वर्षासाठी उपसभापतीपद जाण्याची शक्यता अधिक आहे.सभापती पद हे सर्वसाधारण असल्याने महिला सदस्याला थेट सभापती पदावर बसवले जाण्याची शक्यता कमी आहे.तसे झाले तर कदाचित शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे यांच्या नातेवाईक असलेल्या सुषमा ठाकरे यांच्याकडे सभापती पद जाण्याची शक्यता अधिक आहे.त्याचवेळी शिवसेनेत असलेली चुरस लक्षात घेता विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शेकाप कडून देखील या नाराजी चा फायदा उठविला जाऊ शकतो.त्यात राष्ट्रवादी मधील एक सदस्य भाजपवासी झाले असून ते कोणाचा व्हीप पाळणार हे देखील या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.तर राज्यात होत असलेले राजकीय बदल लक्षात घेता बहुमत असलेला शिवसेना पक्ष सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेकापच्या सदस्यांना जवळ करणार काय?याकडे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.