भारतीय संस्कृती जगाला विश्‍व शांतीचा मार्ग दाखवेल इंद्रेश कुमार यांचे मतः

पुणे प्रवाह न्युज पोर्टल..



भारतीय संस्कृती जगाला विश्‍व शांतीचा मार्ग दाखवेल


इंद्रेश कुमार यांचे मतः २५ व्या ऑनलाईन संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफतांना 


पुणे, दि. २७ नोव्हेंबर:“ईश्‍वर भक्ती ही मानवाच्या हितासाठी आहे. ती कधीही दुसर्‍यांना दुःख देण्यासाठी नाही. दुसर्‍यांच्या कष्टाला आधार देऊन त्यांचे कष्ट कमी करणे हीच भारतीय संस्कृती आहे. आता हीच संस्कृती देशाला विश्‍व गुरू बनवून जगाला विश्‍व शांतीचा मार्ग दाखवेल.” असे मत नवी दिल्ली येथील मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार यांनी मांडले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


याप्रसंगी आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक व कार्याध्यक्ष डॉ.बालाजी तांबे विश्‍व हिंदू परिषदचे उपाध्यक्ष चंपत राय, जीवन विद्या मिशनचे विश्‍वस्त प्रल्हाद वामनराव पै, जगप्रसिद्ध संगणतक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, दिल्ली येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. एस.पी. गौतम आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.


 अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.


या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे, डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. सचिन गाडेकर डॉ. मृदुला कुलकर्णी आणि प्रा. पोर्णिमा बागची हे उपस्थित होते.


इंद्रेश कुमार म्हणाले,“अनंत काळापर्यंत विश्‍व शांती मिळावी यासाठी देशातील संतांनी सर्वांचे जीवन सहज केले आहे. सर्व ग्रंथामध्ये नमूद आहे की दुसर्‍यांना मदत करा, चांगले बना, सहयोगी बना. या तत्वातूनच समन्वय साधला जाईल आणि या सद्भावनेतूनच सर्वांचा विकास होईल. या साठी वेळो वेळी संतांनी मार्गदर्शन केले आहे.”


डॉ, बालाजी तांबे म्हणाले,“आर्टिफिशल इंटेलिजन्सने मानवाचे जीवन सुखी होते, हा समज चुकीचा आहे. सृष्टीवर जेवढी प्रगती झालेली आहे, ती केवळ मटेरियल झोनची झाली असून त्यात मानवाची उत्क्रांती झालेली नाही. आज मानवला प्रेम अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे प्रेमाच्या दिशेनेच खरी प्रगती होणे गरजचे आहे. श्रध्दा ही सर्वात मोठी गोष्ट आहे. समजा ती ईश्‍वरावरून गेली तर हळू हळू सर्व गोष्टींवरून श्रध्दा संपुष्टात येते आणि हेच मानवाच्या दुखःचे सर्वात मोठे कारण आहे. अशा वेळेस ईश्‍वराचे नामस्मरण करून चांगले अन्न या शरीरात जाणे गरजेचे आहे. त्यातून पेशी मजबूत बनतील व आपले आरोग्य उत्तम राहील. आयुर्वेदातही चांगल्या आरोग्यासाठी बर्‍याच गोष्टीं समाविष्ट आहेत. कोणत्याही गोष्टीचे श्रवणकरून किंवा वाचून भले होणार नाही. अशा वेळेस इंटिलिजेट इंन्टीग्रेटचा वापर केल्यास सृष्टीवरील प्रत्येक व्यक्ती आनंदी, समृद्ध आणि आरोग्यपूर्ण असेल. आज भारतीय संस्कृती सर्वात प्र्रगत आहे आणि याच्याच आधारे भारत लवकरच विश्‍व गुरू बनेल.”


चंपत राय म्हणाले,“भगवान श्री राम आयुष्य भर जे जीवन जगले त्याचे आचरण आजच्या युगात मानवाकडून होणेे गरजेचे आहे. असा व्यवहारच सृष्टीला शांतीचा मार्ग दाखवू शकतो. श्रीरामाने लहान वयातच समाजातील दुःखांना दूर करण्याचा प्रयत्न केला. ते मर्यादा पुरूषोत्तम असून सर्वांना प्रसन्न ठेवण्यासाठी जगणारे व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या आचरणातून दुसर्‍यांना शिकविले आहे. श्री राम यांनी संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाला दोष दिला नाही. हीच भूमिका आजच्या काळात पार पाडणे गरजेचे आहे.”


प्रल्हाद वामनराव पै म्हणतात,“हे ईश्‍वरा सर्वांना चांगली बुदधी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्‍वर्यात ठेव, सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. या ईश्‍वर प्रार्थनेने सृष्टीतील सर्व व्यक्ती सुखी व समाधानी होतील. मानवाचे मन हे सकारात्मक विचारांनी भरले जाते. चंचल मन हे सदैव सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते पण ते जगातील विषयांच्या आधारे घेत असतो. जे तात्पूर्त सुख असते. अशा अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी ही प्रार्थना महत्वाची आहे. मनाला प्रसन्न केल्याने संपूर्ण विश्‍व हे सुखी व समाधानी होईल.”


प्रा. एस.पी. गौतम म्हणाले,“भारतीय संस्कृतीने सदैव सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी कोण आहे, याचा शोध घेतांना सोहम् हे उत्तर मिळते. अध्यात्मामध्ये आपण जीवन कसे जगावे याचे ज्ञान दिले आहे. सृष्टीवरील निर्मिती, पालन आणि प्रलय या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळे नाही तर ते एकच आहे. त्यासाठी ऊर्जा ही महत्वाची गोष्ट सांगितली आहे. अशावेळेस ऊर्जा ही परिस्थिती नुसार आपले स्वरूप बदलत असते. भागवतामध्ये सुद्धा सृष्टीची निर्मिती कसी झाली आहे याचा उल्लेख सापडतो.”


डॉ. विजय भटकर म्हणाले,“ श्री राम हे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. यांच्याच नावाने अयोध्या येथे उभारण्यात येत असलेले श्री राम मंदिर हे ज्ञान मंदिर व्हावे यासाठी अशी त्याची रचना करावी.”


डॉ. एन.एन. पठाण म्हणाले,“हिंदू-मुस्लिम तणावामुळे देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होतांना दिसत आहे. हा तणाव कमी करण्याची आज नितांत गरज असून त्यासाठी संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम व एकनाथ महाराज अशा संतांनी दिलेल्या सांप्रदायिक सद्भावाचा संदेश रूजविणे गरजेचे आहे.”


प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक श्रीराम आहे. अयोध्या येथे त्यांच्या नावाने शांतीचे मानवता विद्यापीठ उभारले जावे. अयोध्या ही जगाची संस्कृतीक राजधानी म्हणून ओळखली जाईल. तसेच, ज्ञान तीर्थ क्षेत्र म्हणून ते उद्यास येईल.”


डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले.


डॉ.मिलिंद पत्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनुराधा पराशर यांनी आभार मानले.