मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हॉटेल मालकाला लुटणारे जेरबंद....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आकाश हॉटेल येथे पहाटे गोळीबार करून लूट प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या चार तासांत बोईसर येथून अटक केली. 


महामार्गावरील धुंदलवाडी अंबोली येथील हॉटेल आकाश येथे रात्री ३ वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञातांनी हॉटेलवर पाळत ठेवून बंदुकीचा धाक दाखवून एक लाख १० हजार रुपयांची रोख रक्कमेची लूट केली होती. रात्री २ वाजता तीन व्यक्ती हॉटेलमध्ये जेवण करून झाल्यावर पैसे देण्याचा बहाण्याने हॉटेल मालकाला बंदुकीचा धाक दाखवून गल्ल्यातील रोख रक्कम आरोपींनी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास लुटली. त्यानंतर पळून जाताना हॉटेल मालकाने, त्यांचा मुलगा तसेच इतर वाहनांच्या चालकांनी प्रतिकार करत दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. हॉटेल मालकाने प्रसंगावधान दाखवून आरोपीच्या कारवर हल्ला चढवला व वाहनाची चावी ताब्यात घेतली. आरोपींना प्रतिकार करणाऱ्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला असता एकाने बंदुकीतून ३ राउंड हवेत झाडले आणि पलायन केले. घटनेची माहिती कासा पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उप विभागीय अधिकारी, दहा पोलीस अधिकारी तसेच १२० पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंतरराज्य सीमेवर पाळत ठेवून तसेच नाकाबंदी करून शोध मोहीम हाती घेतली होती. याआरोपींना तातडीने पकडण्यासाठी ठाणे येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्याचा आधारे कसून तपासाची चक्रे तातडीने फिरवत तिन्ही आरोपीना चार तासात जेरबंद करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी १९ ते २१ वयोगटातील असून ते परराज्यातील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकारांना दिली.