प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रात क्रांती हेमंत पाध्ये यांचे मत; 'टीटीए'तर्फे 'इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह'वर व्याख्यान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे : जागतिक स्तरावर संशोधन आणि विकास यावर ऑटोमोटिव्ह कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक केली जात आहे. जवळपास सर्वच देश प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन क्षेत्रात नवोन्मेष घडवून आणत आहेत. इलेक्ट्रिकल व्हेइकल्ससह स्वयंचलित वाहने उत्पादित करण्याचे नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने ऑटोमोटिव्ह (वाहन) क्षेत्रात क्रांती घडत आहे," असे मत प्रो-बिझनेस इनोव्हेशन्सचे संचालक हेमंत पाध्ये यांनी व्यक्त केले.


       टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन (टीटीए), डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (डीओटी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह'वर व्याख्यानात हेमंत पाध्ये बोलत होते. झूम मिटद्वारे झालेल्या या सत्राचे उद्घाटन 'डिओटी'चे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. यावेळी 'टीटीए'चे यशवंत घारपुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, 'टीटीए'चे सचिव विलास रबडे आदी उपस्थित होते.  


        हेमंत पाध्ये म्हणाले, "विविध मोटर वाहन कंपन्यांनी दाखल केलेल्या पेटंटची संख्या वाढत आहे. इनोव्हेशन करणारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवनवी क्षेत्रे उदयास येत असून, ती विकसित होत आहेत. नव्याने विकसित होणाऱ्या उत्पादनाची यशस्विता राखणे महत्वाचे आहे. उत्पादन विकास प्रक्रिया आणि उत्पादन नाविन्यपूर्ण प्रक्रिया याचा मेळ घालता आला पाहिजे. ऑटोमोटिव्ह कंपन्यांद्वारे प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यात आणि वर्गातील उत्पादनांमध्ये नाविन्यपूर्णता आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत."


        डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, "ऑटोमोटिव्ह, इनोव्हेशन आणि इन्व्हेंशन या गोष्टींसाठी संध्या चांगले वातावरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडूनही संशोधनाला प्रोत्साहन दिले जात आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक आणि स्वयंचलित वाहने प्रत्यक्ष वापरात येतील." जागतिक पातळीवर ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील प्रवाह, इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठीच्या (इव्ही) संधी, आयसीई ते इव्ही मायग्रेशन आदी मुद्यांवर हेमंत पाध्ये प्रकाश टाकला. 


     टिटीएने मॉडर्न कॉलेज व विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फौंडेशन कंपनीबरोबर करार केला असून इलेक्ट्रिक ऑटोरिक्षासाठी विद्यार्थ्यांनाकडून एआरएआय प्रमाणित किट विकसित केले जाणार आहे. त्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे रिसर्च पार्क फौंडेशन अर्थसहाय करणार आहे. टीटीएचे औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ सभासद विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. अशा तऱ्हेने शिक्षण क्षेत्र व उद्योग जगत यांच्या मिलाफातून देशाला आत्मनिर्भर करणारे जागतिक दर्जाचे उत्पादन होणार आहे, अशी माहिती मॉडर्न इंजिनीरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल डीपार्टमेंटच्या प्रमुख डॉ सौ नीलिमा कुलकर्णी यांनी दिली. रिसर्च पार्क फौंडेशन कंपनीचे डॉ. अरविंद शाळीग्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. यशवंत घारपुरे यांनी प्रास्ताविक केले. विलास रबडे यांनी आभार मानले.