पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*(बातमी प्रसिद्धीसाठी)*
दिनांक ९ जुलै
सारथी संस्थेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे पार पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक असल्याचे भासवत भाजपच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी बैठकीत गोंधळ घातला. त्यानंतर सर्व बैठक शांत मार्गाने पार पाडत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेला ८ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली व दोन तासात निधीही दिला. त्यामुळे गोंधळ घालण्याची भाजपची संस्कृती समोर आली. तर उलट "ठोस काम करण्याची राष्ट्रवादीची कृती" अजितदादांच्या माध्यमातून समोर आली. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजय वाघेरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मराठा समाजातील तरुणांसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारने मुंबईत बैठक आयोजित केली होती. मराठा समाजाच्या हितासाठी सुरु केलेल्या सारथी संस्था बंद करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नसल्याचा त्रागा संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला होता. या सर्व घडामोडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने आज मुंबई येथे बैठक बोलावली. या बैठकीला अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार संभाजीराजे भोसले, शिवसंग्राम विनायक मेटे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील, मराठी क्रांती मोर्चाचे वीरेंद्र पवार हे बैठकीला उपस्थित होते.
यावेळी संभाजीराजे यांना तिसऱ्या रांगेत बसवले म्हणून भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी बैठकीत गोंधळ घातला. मात्र या बैठकीचे गांभिर्य त्यांना समजले नाही. मराठा समाजाने राज्यात हजारोंच्या संख्येने अनेक मूक मोर्चे काढले, अनेक मराठी बांधवांनी प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठे समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्कालीन भाजपच्या सरकारला शहाणपण सुचलं. यावेळी विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही विरोधी भूमिका घेतली नाही. तसेच सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम मराठा समाजातील तरुणासाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेला बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ आठ कोटी रुपयाचा निधीची घोषणा केली आणि दोन तासात निधीही सुपूर्त केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी मराठा समाजाच्या हितासाठी कार्यरत आहे, "राष्ट्रवादीचा ठोस निर्णय.. राष्ट्रवादीची ठाम कृती" या उक्तीप्रमाणे आणि अजितदादांनी बोललो तेच करतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले असे वाघेरे यांनी म्हटले आहे.