कोरोना बरोबर आता साथीच्या आजारांचे आव्हान!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना बरोबर आता साथीच्या आजारांचे आव्हान!
____________________________________


राज्यात कोरोनाच्या साथीचा मुकाबला करताना त्राहीमाम झालेल्या आरोग्य यंत्रणांना आता स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींचा मुकाबला करण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे.  करोनाच्या आजारांची जी लक्षणे दिसतात तशीच लक्षणे बहुतेक साथीच्या आजारात दिसून येतात. यात रुग्णाला सर्दी, खोकला, ताप अशीच लक्षणे दिसत असल्याने एकाचवेळी करोना व साथीचे आजार यांचे नेमके वर्गीकरण करून इलाज कसा करायचा तसेच यासाठी रुग्ण तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी करोना संरक्षित पोशाख किती प्रमाणात द्यावे लागतील असा नवीन पेच आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांपुढे निर्माण झाला आहे. त्यातही सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची करोना चाचणी करावी लागणार असून ही चाचणी वेळेत होणे नेमक्या निष्कर्षासाठी गरजेचे असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. आजच्या परिस्थितीत करोना चाचणीचा निकाल आल्यानंतरच अशा रुग्णांचे योग्य निदान करून उपचार करणे शक्य होणार आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत असताना दुसरीकडे एकट्या एप्रिल महिन्यात राज्यात स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात दिसून येते असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
पंधरा दिवसापूर्वी बांगलादेशात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसायला लागले असून आता आपल्याकडेही हे रुग्ण वाढू लागतील असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. १५ एप्रिलपर्यंत राज्यात डेंग्यूचे ९६६ रुग्ण आढळून आले आहेत तर स्वाईन फ्लूचे ११०, मलेरियाचे १७४४ लेप्टोस्पायरोसिसचे २५ तर चिकनगुनियाचे २६० रुग्ण दिसून आले. यात स्वाईन फ्लूच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून करोना बरोबर आता साथीच्या या आजारांचाही सामना करावा लागणार आहे. सध्या करोनाच्या आजाराचा सामना करण्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतली असून जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी माहितीचे रकाने भरून देण्यातच आमचा जास्त वेळ जातो असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची तक्रार आहे. याबाबत आरोग्य सहसंचालक डॉ सतीश पवार यांना विचारले असता ते म्हणाले, करोनाची साथ व अन्य साथीचे आजार याचा विचार आम्ही मार्च अखेरीस करून आरोग्य यंत्रणेतील रुग्णालयाचे वर्गीकरण करून ठेवले आहे. तसेच स्वाईन फ्लू, करोना, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच मलेरियाच्या रुग्णांची तपासणी व उपचाराची कार्यपद्धती निश्चित केली आहे.
“प्रामुख्याने करोनाच्या रुग्णांना कोरडा खोकला व १००. ४ एवढे तापमान असते. स्वाईन फ्लूमध्ये तापाचे प्रमाण वेगवेगळे असून नाक वाहते तर मलेरियात थंडी भरून ताप येतो आणि चिकनगुनिया व डेंग्यू मध्ये अंग प्रचंड दुखते. आमचे डॉक्टर लक्षण तसेच प्राथमिक तपासणी करून रुग्णाचे निदान करतात व आवश्यकतेनुसार करोना व स्वाईन फ्लूच्या चाचणी करतील. काही रुग्णांबाबत दोन्ही आजार आढळून आले वा लक्षणे दिसली तर तात्काळ त्यांना हायड्रोक्लोरोक्विन व टॅमी फ्लूची औषधे सुरु केली जातील. यानंतर चाचणीत नेमका आजार स्पष्ट झाल्यावर आवश्यक तेवढीच औषधे दिली जातील” असे डॉ सतीश पवार यांनी सांगितले.
याशिवाय आरोग्य विभागाच्या सर्वच रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात तापाचे रुग्ण व अन्य रुग्ण यांना तपासण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था केल्याचे राज्य साथरोग नियंत्रक डॉ आवटे यांनी सांगितले. “करोनाच्या आजारातही ज्यांना लक्षणे आढळून येत नाहीत अशा रुग्णांसाठी अगदी तालुका स्तरावरही विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून एकाच वेळी करोना व साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहेत” सहसंचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले.