स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


स्त्री शिक्षणाचे जनक,
महान क्रांतिकारक,
उत्तम उद्योजक,
सत्य शोधनाचे प्रणेते…
शिवरायांवर पहिला सर्वोत्तम
पोवाडा लिहिणारे शिवशाहीर…
आरक्षणाचे संकल्पक,
भटाचे कर्दनकाळ
शिक्षक दिनाचे खरे मानकरी
*क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले*
यांची आज जयंती… 
त्यानिमित्त महात्मा फुले यांना
*विनम्र अभिवादन !!!*


           *महात्मा जोतिबा फुले*
(११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०)
हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.
सत्यशोधक समाजा’चे संस्थापक,
आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे
आचरण करणारे समाजसुधारक,
एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक
भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत
म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले.


        तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक *'अखंड'* रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला *'गुलामगिरी'* ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. *'अस्पृश्यांची कैफियत'* हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. 


         वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या *‘राईटस् ऑफ मॅन’* या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला.


        जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८४८ साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत.


        समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.


        *‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’* असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. 


        त्यांनी लिहिलेल्या *‘शेतकऱ्याचा आसूड’* या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतीकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. 


अशा या महान सत्यशोधक समाजसुधारकाचे 
२८ नोव्हेंबर १८९० ला निधन झाले.
विज्ञानवादाचा प्रचार-प्रसार करणे आणि 
कर्मकांड, अनिष्ट रूढी-परंपरा यांच्या
पाशातुन बहुजन समाजाची मुक्ती हीच
या थोर महापुरूषांस मानवंदना....
कोटी कोटी प्रणाम.......
   प्रशांत धुमाळ
        पुणे