पुणे प्रवाह न्युज पोर्टल
फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल
_________________________________
लॉकडाऊनकाळात सर्वत्र बंदी असताना रिलायन्स जिओचे नशीब फळफळले आहे. मुकेश अंबानी यांच्या जिओ आणि सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकमध्ये मोठा व्यवहार झाला आहे. फेसबुकने जिओचा ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. याद्वारे फेसबूक ४३५७४ कोटी रुपये गुंतवणार आहे. या घोषणेमुळे फेसबुक जिओची आता सर्वात मोठी शेअरधारक बनली आहे.
या डीलचा फायदा जिओ, फेसबुकबरोबरच तीन कोटी दुकानदारांनाही होणार आहे. तसेच गावांचे रुपडेच पालटणार आहे. मुकेश अंबानी यांनी व्हिडीओद्वारे संवाद साधला आहे.
फेसबुकच्या गुंतवणुकीमुळे जिओचे मूल्य ४.६२ लाख कोटी रुपये झाले आहे. माइनॉरिटी इन्वेस्टमेंटनुसार ही गुंतवणूक आतापर्यंतची सर्वाधिक प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. दोन्ही कंपन्यांच्या या सहकार्यामुळे देशात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि व्यवसायही वाढणार आहे.
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाचे स्वप्नही साकार होण्यास मदत मिळणार आहे.
व्हाट्सअॅप एक डिजिटल अॅप नसून ते आपल्या सर्वांचा मित्र बनले आहे. जे कुटुंब, मित्र, व्यवसाय, माहितीच्या देवाण-घेवाणीद्वारे एकत्र आणत आहे.
रिलायन्स जिओचा जागतिक दर्जाचा डिजिटल कनेक्टिव्हीटी प्लॅटफॉर्म आणि भारतीय लोकांचे फेसबुकशी असलेले संबंध याच्या मदतीने भविष्यात नवनवीन संशोधन होणार आहे. जिओ मार्ट आणि जिओच्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मला व्हॉट्सअॅपसोबत मिळून याचा फायदा होणार आहे. तीन कोटी दुकानदारांना याचा फायदा होईल.
याद्वारे दुकानदार आणि ग्राहक यांना वेगवान आणि चांगला डिजिटल ट्रान्झेक्शनचा प्लॅटफॉर्म मिळणार आहे. ग्राहक घराच्या शेजारील दुकानांमधून दररोज सहजपणे साहित्याची मागणी आणि पोच घेऊ शकणार आहेत.
फेसबुकसोबतच्या या डीलमुळे गावांचा कायापालट होणार असल्याचा दावा अंबानी यांनी केला आहे. आता छोटे गाव, खेड्यांपर्यंत रिलायन्स मार्टद्वारे सरळ सामान जाणार आहे. म्हणजेच देशातील तीन कोटी दुकानदार जियो मार्टचा डिलिवरी पॉइंट म्हणून काम करणार आहेत.
ग्राहकांकडून मिळणाऱ्या ऑर्डरची कमतरता जाणवणार नाही. कारण व्हॉट्सअॅपचा युजर त्यांचा ग्राहक असणार आहे. याचा फायदा सरकारलाही होणार असून कर वसुलीमध्ये कमालीची वाढ होणार आहे.
रिलायन्स अधिकाऱ्यानुसार फळे, भाजीपाला आणि काही कृषी उत्पादनासाठी रिलायन्स थेट शेतकऱ्यांशी हातमिळवणी करणार आहे. यामुळे दलालांना लगाम लागणार आहे. तसेच चांगल्या प्रतिचा भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. रिलायन्ससोबत शेतकरी आल्यास त्याचे उत्पन्नही कमालीचे वाढणार आहे.
छोटे दुकानदार जे दर दिवसाआड शहरात जाऊन सामान घेऊन येतात. त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. त्यांना आता थेट रिलायन्सच सामान पोहोचविणार असल्याने इतरत्र जाण्याची आवश्यकता भासणार नाही.