भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण
____________________________________


कोरोनाच्या विषाणूंनी जगातील तब्बल ६0 देशांमध्ये हाहा:कार माजविला असून, भारतातही पाच जणांना कोरोनाची  लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने मात्र दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात एक अशा तिघांना लागण झाल्याचे नमूद केले आहे. या आजारामुळेच आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना चीनबरोबरच, इटली, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण या देशांत न जाण्याचा सल्ला दिला आहे.
शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांतही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीत कोरोनाचे रुग्ण बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना एकांतवासात वा रुग्णालयातच ठेवावे, अशा सूचना आहेत.
दुबईहून तेलंगणात आलेल्या तसेच सिंगापूरहून दिल्लीत आलेल्या अशा दोघा भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. तसेच राजस्थानात आलेल्या इटालियन नागरिकालाही संसर्ग झाला आहे. त्या सर्वांना रुग्णालयांत नेले असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. याआधी केरळमधील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. पण आता ते सुरक्षित आहेत. इटली व इराणमधून येणार्या प्रत्येकाची तपासणी करण्याचे आदेश विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत.
या आजाराने आतापर्यंत तीन हजार बळी घेतले आहे. त्यापैकी २९१२ मृत्यू चीनमधील असून, अन्य देशांत मरण पावलेल्यांची संख्या १५७ झाली आहे. याशिवाय जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९० हजारांपर्यंत पोहोचली आहे. चीनपाठोपाठ कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरिया व इराणमध्ये आहेत. कोरियात ५०० रुग्ण असून, २८ जण मरण पावले आहेत. इराणच्या उपराष्ट्रपती व आरोग्यमंत्री यांनाही याची लागण झाली असून, त्या देशाच्या प्रमुखांच्या सल्लागाराचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. तिथे आतापर्यंत ६६ जण मरण पावले आहेत. अमेरिकेतही दोन जणांचा बळी घेतला आहे.
रशिया, जर्मनी, सौदी अरेबिया, फ्रान्स, इंडोनेशिया, ब्रिटन युरोपियन युनियन अशा किमान ६० देशांत कोरोना फैलावला आहे. त्यामुळे या सर्व देशांत अनेक निर्बंध घालण्यात आले असून, तेथील जवळपास सर्व सार्वजनिक समारंभ, क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अनेक देशांत शाळांना सुटी देण्यात आली आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*