मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित  विज्ञान रंजन स्पर्धेत जैनिल जैन प्रथम

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित 

विज्ञान रंजन स्पर्धेत जैनिल जैन प्रथम




पुणे : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि विज्ञानाची आवड जोपासली जावी, या हेतूने मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा २०२० मध्ये पुण्याच्या जैनील जैन याने प्रथम क्रमांक पटकावला. नुकताच या स्पर्धेचे बक्षीस वितरण जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या उपस्थितीत झाला. प्रथम आलेल्या जैनिल जैनला पाच हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

विज्ञान रंजन स्पर्धेत बदलापूरच्या राजस कवठणकरने व्दितीय, तर कराडच्या नचिकेत शेवाळेने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजार रुपये बक्षीस मिळाले. तसेच उत्तेजनार्थ-१ या गटात पाच स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपये, तर उत्तेजनार्थ-२ या गटात १० स्पर्धकांना प्रत्येक ५०० रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धेचे संयोजन विनय र. र. यांनी केले. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे झालेल्या या समारंभावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, कोषाध्यक्ष शशी भाटे, दीपाली अकोलकर, पिंपरी चिंचवड शहर अभियंता व सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, प्रमुख कार्यकारी अधिकारी मोहन सावळे, सुनील पोटे, नंदकुमार कासार आदी उपस्थित होते.




या स्पर्धेत १३ ते ५० वयोगटातील आठशे पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. त्यातील ५५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धकांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. त्यात त्यांना विविध प्रकारचे दहा प्रयोग दोन तासात करायचे होते. यात काही प्रयोग स्वतंत्रपणे, तर काही जोडीने करायचे होते. यांमध्ये वर्गीकरण, स्पर्श, जडत्व, चलन, वनस्पतिविज्ञान, भूमिती, सौर घड्याळ, प्रेरणा-प्रतिसाद ध्वनी, प्रकाश, गणित व मराठी भाषा असे प्रयोगाचे विषय होते.

 


स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करून डॉ. जयंत नारळीकर यांनी अवकाश शास्त्राविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ''भविष्यात पृथ्वीचे अस्तित्व टिकविण्यासाठी खगोलशास्त्राची मोठी गरज पडणार आहे. अंतरिक्षात बदल होत आहेत. भविष्यात लहान ग्रह, आकाशात फिरणारे घटक यांच्या घडका होऊ शकतात. त्यामुळे पृथ्वीला धोका पोहचू शकतो. २१२६ मध्ये स्विफ्ट नावाचा धूमकेतू पृथ्वीवर आदळणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. हा धोका टाळायचा असेल तर अंतरिक्षात स्फोटक असणारे यान सोडायचे आणि या धूमकेतूच्या जवळ त्याचा स्फोट करायचा, जेणेकरून त्याची दिशा बदलू शकते आणि पृथ्वीला होणारा धोका टाळून आपण सुखरूप राहू शकतो."





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*