गीत-नृत्य, दिलखुलास संवादाने रंगला वंडर गर्लचा ‘सदाबहार वर्षा’ वर्षा उसगावकर यांच्या नाट्य-चित्रपट कारकिर्दीवरील कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


गीत-नृत्य, दिलखुलास संवादाने रंगला वंडर गर्लचा ‘सदाबहार वर्षा’
वर्षा उसगावकर यांच्या नाट्य-चित्रपट कारकिर्दीवरील कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, संवाद पुणे व पायलवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : मराठी-हिंदी चित्रपटातील बहारदार गीते, दिलखेचक नृत्य आणि लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याशी रंगलेला संवाद अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून उलगडली ‘सदाबहार वर्षा’. रसिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद, गीत-नृत्याला मिळालेली दाद यातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि उपस्थितांना वर्षा उसगावकर यांच्या कारकिर्दीचा प्रवास अनुभवायला मिळाला.
निमित्त होते ते सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्टिट्यूट, संवाद पुणे व पायलवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 28) आयोजित करण्यात आलेल्या ‘सदाबहार वर्षा’ या कार्यक्रमाचे. मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या नाट्य-चित्रपट सृष्टीतील अभिनय कारकिर्दीला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इस्टिट्यूटच्या सूर्यदत्ता प्रोडक्शन आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्टस् विभागाचा शुभारंभ या कार्यक्रमात झाला आणि लोगोचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी सूर्यदत्ता ग्रुपचे डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, कवी रामदास फुटाणे, राजेश पांडे, सचिन इटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, पायलवृंदच्या निकिता मोघे, डॉ. शरदचंद्र दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी वर्षा उसगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या बहारदार कार्यक्रमात वर्षा उसगावकर यांनी चित्रपट गीते, लावणी आणि नृत्याविष्कार सादर करून रसिकांना जिंकले. कार्यक्रमाची सुरुवात ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला’ या गीताने झाली. त्यानंतर ‘ब्रह्मचारी’ नाटकातील ‘यमुनाजळी खेळ खेळू’ हे गीत वर्षा उसगावकर यांनी सादर केले. त्यानंतर या गीतावर नृत्यरचना सादर करण्यात आली. ‘चोरीचा मामला’, ‘न सांगताच आज हे कळे’, ‘रात्र आहे रेशमाची’, ‘साथी कोई भूला’, ‘आज हम तुम’, ‘जी चाहता है’ अशी सुप्रसिद्ध गीते कलाकारांनी सादर केली.
वर्षा उसगावकर यांनी संवादादरम्यान नाटक, चित्रपटातील आठवणींना उजाळा देत 30 वर्षांतील वाटचालीचा अभिनय क्षेत्रातील पट रसिकांसमोर मनमोकळेपणाने खुला केला. दृकश्राव्य माध्यमाद्वारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि प्रशांत दामले यांनी वर्षा उसगावकर यांच्या चित्रपट, नाटकासंदर्भातील रंजक आठवणींना उजाळा दिला. 
या कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची तर कार्यक्रमाचे निमंत्रक सचिन इटकर होते. समिरा गुजर यांनी संहिता लेखन आणि उस्फूर्त निवेदन करून कार्यक्रमात रंगत आणली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे होते. भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, ऐश्वर्या काळे, तेजा देवकर यांनी नृत्याविष्कार सादर केले तर गीते योगीता गोडबोल, अली हुसेन, सौरभ दफ्तरदार तसेच वर्षा उसगावकर यांनी सादर केली. उसगावकर यांनी अभिनेता गोविंदा आणि ऋषी कपूर यांच्यासमवेतच्या आठवणी सांगितल्या. नाटक, चित्रपट कारकिर्द व वैयक्तिक आवडी-निवडीविषयी त्यांनी रसिकांशी दिलखुलास संवाद साधला.   
महापौर म्हणाले, वर्षा उसगावकर यांनी अभिनयाच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करून ते अबाधित राखले आहे. सांस्कृतिक राजधानीत पुणेकरांच्या साक्षीने हा सन्मान सोहळा होत असल्याने या कार्यक्रमाला वेगळे वैभव प्राप्त झाले आहे.
आशा काळे म्हणाल्या, वर्षा म्हणजे नृत्य, गाणे व अभिनय यांचा त्रिवेणी संगम आहे. वर्षा ही एक गुणी, अलौकिक व रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री आहे.
डॉ. संजय चोरडिया यांनी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूच्या माध्यमातून वर्षा उसगावकर यांच्यासमवेत असलेल्या स्नेहबंधाचा उल्लेख करुन भविष्यातही त्यांच्यासमवेत विविध उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली. 
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या वेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने निकिता मोघे आणि संजय ठुबे यांच्या हस्ते उसगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळ : ‘सदाबहार वर्षा’ कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात (डावीकडून) राजेश पांडे, रामदास फुटाणे, डॉ. शरचद्रंच दराडे, मुरलीधर मोहोळ, आशा काळे, सुषमा चोरडिया, वर्षा उसगावकर, डॉ. संजय चोरडिया, सुनील महाजन, सचिन इटकर आणि निकिता मोघे.
-=-


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*