एलआयसी मोठ्या संकटात? बुडित खात्यात गेलेल्या कर्जात दुपटीनं वाढ

एलआयसी मोठ्या संकटात? बुडित खात्यात गेलेल्या कर्जात दुपटीनं वाढ
_________________________________


सरकारी क्षेत्रातली कंपनी असल्यानं भारतीय आयुर्विमा महामंडळावर अनेकजण डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यामुळे कोट्यवधी लोकांनी एलआयसीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र एलआयसी मोठ्या संकटात सापडल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये एलआयसीचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज दुपटीनं वाढल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं दिलं आहे. 


एलआयसीमध्ये कोट्यवधी भारतीयांची गुंतवणूक असल्यानं कंपनीकडे मोठ्या प्रमाणात रोकड जमा होते. त्यामुळे एलआयसी अनेकदा सरकारसाठी संकटमोचक ठरली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारी कंपन्या आणि बँकांचे समभाग खरेदी करुन त्यांना वाचवण्याचं काम एलआयसीनं केलं आहे. मात्र इतर बँका आणि कंपन्यांना वाचवणारी एलआयसी स्वत:च मोठ्या संकटात सापडली आहे. 
खासगी कंपन्यांना हजारो कोट्यवधी रुपयांचं कर्ज देण्याची चूक काही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी केली. यातली अनेक कर्ज बुडाल्यानं बँका अडचणीत आल्या. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी केलेली हीच चूक एलआयसीनं केली आहे. त्यामुळे २०१९-२० च्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल-सप्टेंबर) एलआयसीचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज ६.१० टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे. 
एलआयसीनं टर्म लोन आणि नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर स्वरुपात अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना कर्ज दिली आहेत. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत एलआयसीच्या बुडित खात्यात गेलेल्या कर्जाचा आकडा तब्बल ३० हजार कोटी रुपये इतका होता. एलआयसीची संपत्ती ३६ लाख कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये रोकड आणि स्थावर संपत्तीचा समावेश आहे. एस्सार पोर्ट, आयएल अँड एफएस, डेक्कन क्रोनिकल, भूषण पॉवर, व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज, आलोक इंडस्ट्रीज, एबीजी शीपयार्ड, युनिटेक, जीवीके पॉवर, जीटीएल यासारख्या कंपन्यांनी एलआयसीचं कोट्यवधींचं कर्ज बुडवलं आहे.