अतिवृष्टीबाधितांना लवकरच पूर्ण 'न्याय' ! - महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश - जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

अतिवृष्टीबाधितांना लवकरच पूर्ण 'न्याय' !


- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
- जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत महत्वाचे निर्णय


अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरच पूर्ण 'न्याय' मिळणार असून या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाठपुरव्याला यश आले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत महापौर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत वैयक्तीक झालेल्या नुकसानीचे भरपाई वाटप आणि सीमा भितींसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.


महापौर मोहोळ यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत या भरपाईसंदर्भात पाठपुरावा केला होता. याचाच पुढचा भाग म्हणून महापौर मोहोळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त शांतनू गोयल, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त जयश्री लाभशेटवार यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे जीवित हानी झालेल्या नागरिकांच्या कुटूंबियांना ४ लाखांची मदत देण्यात आली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये लवकरच मिळणार आहेत. या अतिवृष्टीमुळे ४ हजार ७२१ नागरिक बाधित झाले असून त्यापैकी ४ हजार ३०५ नागरिकांना १५ हजारांपैकी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे असून उर्वरित १० हजार रुपयांची मदत लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्नरत आहोत .यातील केवळ ४३५ नागरिकांना १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर आणखी ४१६ नागरिकांना लवकरच मदत केली जात आहे.


अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुकान मालकांना ५० हजार रुपये आणि घर बाधित झालेल्या कुटूंबियांना ९६ हजार रुपये देणे प्रलंबित आहे. याबाबत ६ कोटी रुपयांच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आला असून ही रक्कम उपलब्ध होताच, ती संबंधितांना दिली जाणार आहे.


दुर्घटनेमुळे नाला खोलीकरण, कलर्व्हट, ड्रेनेज लाईन टाकणे, मनपाने बांधलेल्या सीमाभिंती पुन्हा बांधणे अशी कामे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने २५० कोटी रुपयांची तरतूद केली असून नाल्याची सीमाभिंत आणि खासगी सोसायट्यांच्या सीमाभिंती मनपाच्या वतीने बांधून देणे हे महापालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठी राज्य सरकारकडून ७० कोटी रुपये उपलब्ध व्हावेत, यासाठी महापौर मोहोळ यांनी मागणी केली आहे. शिवाय या कामाचे इस्टिमेट आणि कागदपत्रे उपलब्ध करुन दिल्यावर याचाही पाठपुरावा जिल्हाधिकारी करणार आहेत.


या बैठकीसंदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना पूर्ण न्याय देण्यासाठी माझे पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू असून यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी, अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर आढावा आणि आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमुळे हा न्याय मिळण्यास गती मिळाली आहे. या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आणि तातडीने प्रतिसाद देईल, ही अपेक्षा आहे. महापालिकेच्या वतीने मदतीसंदर्भात सर्वतोपरी आढावा मी स्वतः लक्ष घालून घेत आहे'.



प्रकल्प आणि योजनांचाही पाठपुरावा
 
- २४ बाय ७ पाणीपुरवठा
या योजनेसाठी कृषी महाविद्यालयाकडून जागा मिळण्यास अडचण होत असून याबाबत योग्य तो पाठपुरावा करु, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. शिवाय ही पाईपलाईन गणेश खिंड रस्त्याने टाकण्यासंदर्भात महापालिकेने विचार करावा, असेही त्यांनी सुचवले आहे.


- पंतप्रधान आवास योजनेसाठी शासकीय गायरान जमीन
या योजनेसाठी जमीन उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सूचित केली आहे.


- वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक
संगमवाडी येथे स्मारक उभारण्यासाठी एकूण ९६ कोटींपैकी ३० टक्के रक्कम महापालिकेने भरली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. यासंदर्भातही पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.


- भिडेवाडा जतन करण्यासाठी भूसंपादन
या प्रकरणी न्यायालयाने काही आदेश दिले असून अंतिम टी.पी. योजना झाल्यानंतर शासनाने 'अवॉर्ड डिक्लेअर' करावे, असे म्हटले आहे. याबाबत शासकीय वकिलांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.


- पाषाण-कोथरुड बोगदा
या कामसंदर्भात महापालिकेने सर्व्हे आणि डीपीआर तयार करून देण्याच्या सूचना दिल्या असून जिल्हाधिकारी या संदर्भातील पाठपुरावा करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करणार आहेत.


- चांदणी चौक उड्डाणपूल भूसंपादन
या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तीन बैठका झालेल्या आहेत. या उड्डापुलाच्या परवानगीसाठी एनडीएकडे १७ कोटी रुपये भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


- घोरपडी उड्डाणपुलासाठी भूसंपादन
या उड्डाणपुलाच्या जागेच्या भूसंपादनासाठी सरंक्षण खात्याकडून जागा मिळण्यात अडचणी येत असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत.अशी माहिती यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.