पंतप्रधान किसान योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत घट.

पंतप्रधान किसान योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत घट.
__________________________________


शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळविणाऱ्यांची संख्या कमी होत चालल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. योजनेत दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता ज्यांना मिळाला, त्यांतील एक तृतीयांशपेक्षा कमी शेतकरी चौथ्या हप्त्याचे लाभार्थी असतील. महाराष्ट्रात पहिला हप्ता मिळालेल्यांच्या तुलनेत चौथ्या हप्त्याच्या लाभार्थींची संख्या २0 टक्के आहे. सरकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी, प्राप्तिकर भरणारे, व्यावसायिकांना योजनेतून वगळण्यात आल्याने, तसेच अनेक नव्या अटी घातल्याने लाभार्थींची संख्या कमी झाली असावी, असे समजते. कृषी मंत्रालयाने संसदीय समितीला सांगितले की, १४ कोटी शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करण्याचे लक्ष्य होते. पण निम्म्या शेतकऱ्यांना सामील केले. शेतजमिनीचे पुरावे नसणे, आधारशी खाते लिंक नसणे, बँक खात्यांतील त्रुटी आणि ग्रामीण भागात इंटरनेटची संथ सेवा यांमुळे असे घडले. त्यावर संसदीय समितीने सर्व त्रुटी दूर करून आणि राज्य सरकारांची मदत घेत योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना दिल्या आहेत. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात ८१ लाख ८६ हजार शेतकरी लाभार्थी होते. पहिला हप्ता ७६ लाख २१ हजारांना मिळाला. दुसऱ्या हप्त्याच्या वेळी ही संख्या ६७ लाख होती. तिसरा हप्ता मिळाला ४८ लाख ५३ हजार शेतकऱ्यांना आणि चौथ्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे १५ लाख २८ हजार.उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १ कोटी ८३ लाख शेतकऱ्यांना पैसे मिळाले. चौथ्या हप्त्यासाठीच्या शेतकऱ्यांची संख्या आहे ७६ लाख. प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी तीन हप्त्यांत मिळून ६ हजार रुपये देण्याची ही योजना आहे. सुरुवातीला दोन हेक्टर शेती असलेल्यांना ती लागू केली. नंतर शेतीच्या आकाराची मर्यादा काढण्यात आली.