साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं...?
________________________________
राज्य सरकारने पाथरी येथील साईबाबा जन्मस्थानाच्या विकास आराखड्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर शिर्डी आणि पाथरी असा वाद उफाळून आला आहे. याबाबत शिर्डीकरांना साईबाबा यांचा जन्म पाथरीत झाला नसल्याचा दावा करत या निर्णयाविरोधात बेमुदत बंदचं हत्यार उपसलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर हा बंद मागे घेण्यात आला असून मंत्रालयात याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
शिर्डी फक्त भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण नसून याठिकाणी साईबाबांना मिळणाऱ्या देणगीचंही विशेष महत्त्व आहे. भारतातील श्रीमंत देवस्थानामध्ये शिर्डीचा तिसरा नंबर लागतो. अनेक भक्त शिर्डीच्या साईबाबांना सोने-चांदीपासून कोट्यवधी रुपये दान करत असतात. शिर्डीच्या साईबाबांचा खजिना कधीही रिकामा होत नाही तर दिवसेंदिवस यामध्ये भर होताना दिसत असते.
उभं आयुष्य फकिर म्हणून साईबाबा जीवन जगले. ते कोणत्या जातीचे न धर्माचे होते याची कल्पना कोणालाही नाही. मात्र साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात विवाद निर्माण झाला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या २०१७-१८ च्या ऑडिट रिपोर्टनुसार मंदिराची एकूण संपत्ती २ हजार ६९३ कोटी ६९ लाख रुपये आहे. शिर्डीमध्ये नेहमी भक्तांची गर्दी पाहायला मिळते. फक्त राज्यातून नव्हे तर देशविदेशातून भक्त साईंच्या दर्शनासाठी येतात. २०१९ मध्ये सरासरी दिवसाला ७८ कोटी रुपये दान म्हणून साईंच्या पेटीमध्ये जमा होतात. मागील वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत साईबाबांच्या देणगीमध्ये एकूण २८७ कोटींचे दान प्राप्त झाले.
२०१८-१९ च्या आकडेवारीनुसार शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडे २ हजार २३७ कोटी रुपये संपत्ती आहे. २३ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० पर्यंत ११ दिवसाच्या काळात साडेआठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या कालावधीत १७ कोटी ४२ लाख दान साईबाबांना अर्पण करण्यात आले. साईबाबांच्या १०० व्या पुण्यतिथीपूर्वी २०१७ मध्ये शिर्डी विमानतळाचं उद्धाटन करण्यात आलं. अनेक प्रसिद्ध हॉटेल्स या परिसरात उघडण्यात आले आहेत.
शिर्डीपासून २७५ किलोमीटर अंतरावर परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा पाथरीकरांनी केला आहे. तर या दाव्यात सत्य नाही असं शिर्डीकरांचे म्हणणं आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा शिर्डीकरांनी बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे.