7 ते 21 जानेवारी या कालावधीत जिल्हयात "महा रेशीम अभियान"
पुणे, दि. 7 : "महा-रेशीम अभियान-2020" अंतर्गत पुणे जिल्हयासाठी शासनाने नवीन तूती लागवडीकरिता 300 एकरचा लक्षांक दिला आहे. रेशीम शेतीसाठी मनरेगाअंतर्गत बारामती, इंदापुर, खेड, दौंड, पुरंदर, शिरूर रेशीम रथामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 जानेवारी ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत जिल्हयात महा-रेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुधीर जोशी, उपजिल्हाधिकारी देशमुख, रेशीम विकास अधिकारी तथा प्र.सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व्ही.पी.पावसकर, राजेश कांबळे, पी.जी.शिरसाठ, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक व्हि.आर.ढाणे, एस.व्हि.गुरव. बि.डी.माने, के.एन.हजारे, डी.एम.पवार उपस्थित होते.
"महा-रेशीम अभियान-2020" अंतर्गत लाभार्थींनी परिपूर्ण कागदपत्रासह नोंदणी पूर्ण करावी. 15 दिवसांच्या कालावधीत जे लाभार्थी नोंदणी करतील असे लाभार्थी सन 2020-21 करिता मनरेगा योजनेअंतर्गत शासनाच्या निकषानूसार पात्र राहतील. सदरच्या नोंदणी कार्यक्रमासाठी समूहनिहाय, ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला असून ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या समन्वयातून ग्रामस्तरापर्यंत योजनेची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थींनी वरील ग्रामस्तरावरील अधिका-यांशी संपर्कात राहून विहीत मुदतीमध्ये परिपूर्ण प्रस्ताव तयार करून जिल्हा रेशीम कार्यालयाचे समूह प्रमूखांचे माध्यमातून नोंदणी पूर्ण करावी,असे आवाहन रेशीम विकास अधिकारी कविता देशपांडे यांनी केले आहे.
7 ते 21 जानेवारी या कालावधीत जिल्हयात "महा रेशीम अभियान"