पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींकडून समाधान व्यक्त केलं जातं आहे. तीन दिवसांपूर्वीच संबंधित आरोपींनी एका तरुणाला बेदम मारहाण करत धमकावले होते. वाकड पोलिसांनी विशाल कसबे, अरविंद साठे, बग्या उर्फ राहुल लष्करे, सूरज पवार यांची धिंड काढली. विशाल कसबे हा तडीपार गुंड आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी आरोपी बाळू भोसले, शाहरुख खान, अरविंद साठे, आकाश, राहुल पवार, सूरज पवार, बुग्या, सोमा लोखंडे आणि इतर ५ आरोपींनी काळखडक येथे मल्हारी मोतीराम लोंढे (२८) या तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण केली होती.त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


आरोपींनी फिर्यादीला काळखडक येथील पाण्याच्या टाकीजवळ नेऊन 'तू काय खूप मोठा झालास का? भेटायला बोलावलं तरी येत नाहीस. तुझ्यासाठी थांबायला आम्ही वेडे आहोत का ? तू आम्हाला जागा भाड्याने न देता दुसऱ्याला देतो. तुझी मस्तीच जिरवतो असे म्हणत लाकडी दांडके आणि लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली होती.


सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांच्या पथकाने विशाल कसबे, अरविंद साठे, बग्या उर्फ राहुल लष्करे, सूरज पवार यांना अटक करून काळखडक येथील परिसरात त्यांची धिंड काढली. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी त्यांचे मोबाईलवर व्हिडिओ देखील घेतले. आरोपींना हातात दोरखंड बांधून नेण्यात आले होते. त्यांच्याभोवती पोलीस कर्मचारी आणि अधिकारी होते.